विज्ञानाने प्रगती केली असली, तरी सृष्टी आणि मानवजात राहील की नाही या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. अर्धवट ज्ञान धोकादायक असते. केवळ पुस्तकी ज्ञानाने प्रश्न सुटणार नाहीत तर अनुभूती महत्त्वाची आहे. त्यामुळेच विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम झाल्याखेरीज पूर्ण ज्ञानाची प्राप्ती होणार नाही, असे मत ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी रविवारी व्यक्त केले.
‘ज्ञानगंगा’तर्फे आचार्य अत्रे सभागृह येथे भरविण्यात आलेल्या ‘ज्ञानोत्सव २०१४’ या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते झाले. गिरीश अत्रे यांनी भटकर यांच्याशी संवाद साधला.
भटकर म्हणाले, कर्माचा सिद्धांत ही श्रद्धा आहे. प्रारब्ध की पुरुषार्थ हा गूढ प्रश्न आहे. मला विचारांचे आणि कृतीचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे प्रारब्ध आणि स्वातंत्र्य हे एकाच गोष्टीकडे पाहण्याचे वेगवेगळे पैलू आहेत. हाच विचार विज्ञानामध्ये आला आहे. ईश्वर सगुण साकार आहे की निगुर्ण निराकार याचे ज्ञान विज्ञानातून मिळणार आहे. १८ महिन्यांनी संगणकाधारे मिळणारे ज्ञान द्विगुणीत होते. मग हे तंत्रज्ञान अशाश्वत आहे. ज्ञानेश्वरीमध्ये कोणताही बदल नसल्याने हे शाश्वत ज्ञान आहे. विवेक जागृत करते ते खरे शिक्षण.
संगणकाला मानवी भाषा देऊ शकतो का आणि संगणकाला संभाषण देता येईल का या दृष्टीने संशोधन सुरू आहे. संगणकावर देवनागरी रोमन लिपीमध्ये कशी मांडता येईल यासाठी वाङ्मयाचा अभ्यास केला जात आहे. भाषा समजून घेतली की अनेक गोष्टी समजतात, असे सांगून भटकर म्हणाले, ज्ञान हे संस्कृतीचे अधिष्ठान आहे. हे ज्ञान पुस्तकातून प्रकट होते. अंतिम सत्याचा शोध घेणे हे ज्ञान संपादनाचे उद्दिष्ट आहे.
‘ज्ञानगंगा’चे उमेश पाटील यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Science vijay bhatkar soul speech
First published on: 04-08-2014 at 03:05 IST