विज्ञान संशोधनासाठी अल्पसा निधी वाढविणारे सरकार वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करण्यामध्ये कुचकामी ठरत आहे. सरकारच्या या दांभिकतेवर टीका करत शास्त्रज्ञांनी शनिवारी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. ‘अभ्यास, निरीक्षण, संशोधनातून समोर आलेले वैज्ञानिक पुरावे स्वीकारण्यामध्ये सरकार ठोस भूमिका बजावत नाही. सरकार अजूनही श्रुती-स्मृती पुराणामध्येच अडकले आहे,’ अशी टीका दिल्लीच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इम्युनोलॉजी येथील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. सत्यजित रथ यांनी या वेळी केली.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याच्या मागणीसाठी शास्त्रज्ञ, विज्ञानाचे अभ्यासक, संशोधक, विज्ञान लेखक आणि विद्यार्थ्यांसह सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. ‘नीतीमध्ये करा सुधार, वैज्ञानिकांची ऐका पुकार’, ‘सायन्स, नॉट सायलेन्स’ असे फलक हाती घेऊन कार्यकर्त्यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर एक तासभर निदर्शने केली. त्या प्रसंगी डॉ. रथ बोलत होते.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व्हावा, विज्ञान विषयातील संशोधनासाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा याकडे लक्ष वेधण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली, असे सांगून सत्यजित रथ म्हणाले, विज्ञानाचे दोन पैलू आहेत. तंत्रज्ञानाचा विकास सर्वाना भावतो. मात्र, सामाजिक सक्षमीकरण, बाजारीकरण रोखण्याबरोबरच आर्थिक आणि सामाजिक विषमता दूर करून न्यायाची अनुभूती येण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार हा महत्त्वाचा पैलू आहे. हा विचार शिक्षणातूनच येऊ शकतो. अभ्यास, निरीक्षण, संशोधनातून समोर आलेले पुरावे स्वीकारण्यामध्ये सरकार युधिष्ठिराची भूमिका बजावत आहे. सरकार अजूनही श्रुती-स्मृती पुराणामध्येच अडकले असल्याने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्यासाठी पुन्हा पुन्हा रस्त्यावर येण्याची आवश्यकता आहे.

उच्च शिक्षणात मूलभूत संशोधनाला अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे, उच्च शिक्षणाला पुरेसा निधी उपलब्ध व्हावा, अवैज्ञानिक संकल्पनांना प्रतिष्ठा न देता समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व्हावा, यांसह विविध वैज्ञानिक मागण्यांसाठी देशभरातील शास्त्रज्ञ शनिवारी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले. ‘इंडिया मार्च फॉर सायन्स’ मोर्चाच्या माध्यमातून झालेल्या या निदर्शनांमध्ये विज्ञानाच्या गळचेपीविरोधात आवाज बुलंद करण्यात आला. निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. सत्यजित रथ, ‘आयसर’मधील संशोधक अर्णब घोष, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनंत फडके, गीता महाशब्दे, विनिता बाळ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सचिव मििलद देशमुख, दीपक गिरमे, ठकसेन गोराणे, श्रीपाद ललवाणी यांच्यासह युवा संशोधक आणि कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते

राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस

समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन २० ऑगस्ट हा दिवस ‘इंडिया मार्च फॉर सायन्स’तर्फे राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्या दिवशी शास्त्रज्ञांसह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणार आहेत, अशी माहिती गीता महाशब्दे यांनी दिली.