ट्रक, मोटार, जीप, पीक अप गाडय़ा अशा वाहनांची चोरी करून रात्रीत त्या वाहनांची गॅस कटरच्या साहाय्याने विल्हेवाट लावणाऱ्या सराईत चोरटय़ासह त्याच्या साथीदाराला सिंहगड पोलिसांनी जेरबंद केले.
सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा येथे एका पत्र्याच्या टपरीत चोरून आणलेली वाहने गॅसकटरच्या साहाय्याने कापली जात होती. त्यानंतर या वाहनांचे इंजिन, सुट्टे भाग काढून त्याची विक्री केली जात होती. चोरटय़ांकडून बारा वाहनांचे इंजिन, चार चारचाकी वाहने असा २४ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी सराईत वाहनचोर राजू बाबूराव जावळकर (वय ४५, रा. रायकर मळा, वडगाव धायरी, सिंहगड रस्ता) आणि त्याचा साथीदार सोमनाथ सुभाष चौधरी (वय ३०, रा. सहजीवन सोसायटी, भेकराईनगर, फुरसुंगी, सासवड रस्ता) अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. नांदेड फाटा येथील दळवीवाडी परिसरात अवजड वाहने तोडून त्यातील सुटय़ा भागांची विक्री केली जात होती. सिंहगड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार यशवंत ओंबासे आणि संतोष सावंत यांना ही माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचे पथक तेथे गेले. पोलिसांना पाहताच आरोपी राजू आणि त्याचा साथीदार सोमनाथ हे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
त्यानंतर पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर होते. हे दोघे जण मोटारीतून नांदेड फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळताच पाठलाग करून पोलिसांनी राजू आणि सोमनाथ यांना जेरबंद केले. चौकशीत नगर, सुपे, संगमनेर, पुण्यातील सिंहगड रस्ता आणि कोथरूड परिसरातून चारचाकी वाहने चोरल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्याकडून ट्रक, मोटार, माल वाहतूक करणाऱ्या पिक अप गाडय़ा, एक दुचाकी अशा बारा वाहनांची इंजिन्स आणि चार मोटारी असा २४ लाख ४१ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त मििलद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू जगताप, गुन्हे शाखेचे निरीक्षक नितीन जाधव, उपनिरीक्षक शिवदास गायकवाड, कैलास मोहोळ, यशवंत ओंबासे, पांडुरंग जगताप, प्रशांत काकडे, सुदाम वावरे, रामचंद्र पवार, संतोष सावंत, उमेश फणसे, गजानन सोनुणे, दत्ता सोनवणे, रफीक नदाफ यांनी ही कारवाई केली.
 वाहनचोरीचे तब्बल १३० गुन्हे
सराईत वाहनचोर राजू जावळकर याच्याविरुद्ध राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये वाहनचोरीचे १३० गुन्हे दाखल झाले आहेत. काही गुन्ह्य़ात त्याला न्यायालयाने शिक्षा देखील सुनावली आहे. राजू आणि त्याचा साथीदार सोमनाथ हे चोरलेल्या वाहनांची एका रात्रीत विल्हेवाट लावत असत. वाहनांचे सुट्टे भाग भंगार व्यावसायिकांना विकण्याचे काम करायचे. राजू हा अवजड वाहने चोरण्यात पटाईत आहे. त्यांच्याकडून वाहनचोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.