चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी दिलेला फटमार, अभिनेते चंद्रकांत मांढरे यांच्या हस्ते फुटलेला मुहूर्ताचा नारळ आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी कॅमेऱ्यामागे राहून केलेले पहिल्या दृश्याचे चित्रीकरण.. ग्रामीण भागातील राजकारणावर विजय तेंडुलकर यांच्या सशक्त लेखणीतून साकारलेले भाष्य.. डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांच्या जबरदस्त अभिनयाचा ‘सामना’.. ३७८ रुपये पगार असलेले चित्रकला शिक्षक रामदास फुटाणे यांचे निर्माता आणि डॉ. जब्बार पटेल यांचे दिग्दर्शक म्हणून चित्रसृष्टीत झालेले पदार्पण.. भास्कर चंदावरकर यांच्या संगीताने नटलेली गीते.. या आठवणींना उजाळा देत ‘सामना : नाबाद ४०’ कार्यक्रमाद्वारे या चित्रपटाची चित्तरकथा शनिवारी उलगडली.
‘मारुती कांबळेचं काय झालं’ या अजरामर संवादासह सरपंच आणि मास्तर यांच्यातील संभाषणाची जुगलबंदी, ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’, ‘सख्या रे घायाळ मी हरिणी’ अशी गाणी पडद्यावर पाहताना रसिकांनी जणू ‘सामना’ चित्रपटाची नव्याने अनुभूती घेतली. कलासंस्कृती परिवारतर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ. श्रीराम लागू, डॉ. जब्बार पटेल, रामदास फुटाणे, चित्रपट अभ्यासक समर नखाते, माजी आमदार उल्हास पवार आणि ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांच्याशी राज काझी यांनी संवाद साधला. मेघराजराजे भोसले आणि वैभव जोशी यांनी सर्वाचा सत्कार केला.
‘सामना’ हा संवेदनशील आणि मोठा आवाका असलेला चित्रपट आहे. सुरुवातीला आम्ही आणि प्रेक्षकांनीही या चित्रपटाला फारसे गांभीर्याने घेतले नाही. फार महत्त्वाच्या चित्रपटामध्ये काम करायला अपुरा पडलो असे वाटते. मला स्वीकारले याबद्दल मी रसिकांचा आभारी आहे, अशी भावना डॉ. श्रीराम लागू यांनी व्यक्त केली. निळूभाऊ फुले या माणसाची महाराष्ट्राने म्हणावी तेवढी कदर केली नाही, असेही त्यांनी सांगितले.
विजय तेंडुलकर यांची लेखक म्हणून केलेली निवड यामध्येच चित्रपटाचे यश निश्चित होते, असे रामदास फुटाणे यांनी सांगितले. ‘सोंगाडय़ा’ चित्रपटाच्या वेळी दादा कोंडके यांच्याकडे प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून केलेल्या कामाचा निर्माता म्हणून फायदा झाला. त्या वेळी अवघ्या दीड लाख रुपयांत चित्रपट झाला. पण, तेही जमा करताना कष्ट पडले. बर्लिन चित्रपटासाठी निवड झाल्यानंतर तेथे जाण्यासाठी एका दिवसामध्ये झालेला पासपोर्ट आणि ६७ हजार रुपयांवरून २७ हजार रुपयांपर्यंत कमी झालेले विमानभाडे हा किस्साही फुटाणे यांनी सांगितला.
स्वातंत्र्यानंतर सत्तेमध्ये सहभागी झालेला आणि स्वातंत्र्य कशासाठी या विचारांनी संभ्रमित झालेला असा दोन प्रवृत्तींमधील हा सामना आहे. दूरदृष्टी असलेल्या तेंडुलकरांच्या संवादांनी हा चित्रपट इतक्या वर्षांनीही तेवढाच ताजा असल्याचे जब्बार पटेल यांनी सांगितले. अनेक राजकारण्यांनी या चित्रपटाचा आनंद घेतला असल्याचे उल्हास पवार यांनी सांगितले.
‘सामना’ ही माझी पेन्शन
‘सामना’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पुण्यामध्ये जेमतेम थिएटर भाडय़ाचे पैसे मिळाले. तर, मुंबईमध्ये ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. सर्वाचे देणे फिटल्यानंतर दोन वर्षांनी चित्रपटाचे हक्क माझ्याकडे आले. बर्लिन महोत्सवानंतर हा चित्रपट यशस्वी झाला. आता ‘सामना’ चित्रपट हा माझ्यासाठी निवृत्तिवेतन म्हणजे पेन्शनची रक्कम देणारा ठरला असल्याचे रामदास फुटाणे यांनी सांगितले.

all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
artificial intelligence generating revolution in film industry
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेने चित्रपटांना संजीवनी
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
supriya pilgaonkar praised swatantra veer savarkar movie
“१२ वर्षांची असताना माझ्या वडिलांनी…”, सुप्रिया पिळगांवकरांची ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल पोस्ट; म्हणाल्या…