‘‘जैवविविधताविषयक धोरणांच्या आखणीत सागरी जैवविविधता हा दुर्लक्षित मुद्दा आहे. सागरी जैवविविधतेचे रक्षण ही सध्या वनखात्याची जबाबदारी आहे. परंतु या जैवविविधतेसाठी खूप वेगळ्या प्रकारे अभ्यास करण्याची गरज असल्यामुळे त्यासाठी स्वतंत्र धोरणे आणि स्वतंत्र खात्याचीही आवश्यकता आहे,’’ असे मत ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’च्या संवर्धन विभागाचे उपसंचालक आणि सागरी जैवविविधता तज्ज्ञ डॉ. दीपक आपटे यांनी व्यक्त केले.
किलरेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आपटे म्हणाले, ‘‘निसर्गसंवर्धनाची आपली कल्पना केवळ जमिनीवरील सजीवांच्या संवर्धनापुरतीच मर्यादित आहे. कोकण किनारपट्टीवर पुढील दहा वर्षांत १५ ऊर्जानिर्मिती केंद्रे उभी राहणार आहेत. ऊर्जानिर्मिती केंद्रांमधून समुद्रात सातत्याने मोठय़ा प्रमाणावर गरम पाणी सोडले जाते. समुद्री जीव पाण्याच्या तापमानाला खूप संवेदनशील असल्यामुळे समुद्रकिनाऱ्यापासून १० फॅदमपर्यंतच्या मासेमारीच्या पट्टय़ातील जैवविविधतेवर मोठे परिणाम शक्य आहेत. दाभोळ खाडी परिसरात एकाच ठिकाणी ६ ऊर्जानिर्मिती केंद्रे उभारली जात आहेत. अशा प्रकारची ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ जेथे होणार आहे त्या किनारी भागातील संभाव्य परिणामांचा संकलित पद्धतीने विचार होणे आवश्यक आहे.’’
समुद्रात राहणारा ‘डय़ूगाँग’ हा सस्तन प्राणी, व्हेल शार्क, केवळ अंदमान-निकोबारला सापडणारी ‘लेदरबॅक’ कासवे, लक्षद्वीपला सापडणारा मोठय़ा शिंपल्याच्या आकाराचा प्राणी या सागरी जीवांच्या संख्येवर विपरीत परिणाम झालेला दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.