उन्हाळी सुटय़ांच्या दोन महिन्यांमध्ये विज्ञानामधील साधे प्रयोग शिकून छोटय़ा संशोधन प्रकल्पांवर काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आधी एका निबंधस्पर्धेत भाग घ्यावा लागणार असून ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उपक्रमात प्राधान्य दिले जाणार आहे.
‘मूव्हिंग अॅकॅडमी ऑफ मेडिसिन अँड बायोमेडिसिन’ या संस्थेतर्फे ‘शोध बालवैज्ञानिकांचा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील १४ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना त्यात सहभागी होता येईल. एप्रिल व मे महिन्यात चालणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थी जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, माती परीक्षण, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी आणि आरोग्यावर आधारित संशोधन प्रकल्प यांपैकी विषय हाताळू शकतील, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. माधव देव यांनी दिली.
सहभागी विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मार्गदर्शन व दरमहा अडीच हजार रुपये शिष्यवृत्तीही दिली जाते. प्रकल्प व्यवस्थापक प्रकाश पवार म्हणाले,‘‘गतवर्षी ४० विद्यार्थी यात सहभागी झाले होते. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य असून ५ ते १० टक्के विद्यार्थी शहरी भागातील असतात. बाहेरील विद्यार्थ्यांच्या राहण्याची व वाहतुकीची सोय संस्थेतर्फे मोफत केली जाते.’’
सहभागी होण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी ‘अपारंपरिक ऊर्जा स्रोत’, ‘तंबाखूचे आरोग्यावरील दुष्परिणाम’, ‘डेंगी, इबोला, स्वाईन फ्लूसारख्या रोगांचा वाढता प्रभाव’, ‘एचआयव्ही एडस्’, ‘अॅनिमिया’ आणि ‘कर्करोग’ यांपैकी एका विषयावर पाचशे ते आठशे शब्दांत निबंध लिहून तो ७ एप्रिलपर्यंत संस्थेकडे पाठवायचा आहे. विद्यार्थ्यांनी ‘मूव्हिंग अॅकॅडमी ऑफ मेडिसिन अँड बायोमेडिसिन, १३ स्वस्तिश्री सोसायटी, गणेशनगर, पुणे- ४११०५२ या पत्त्यावर अर्ज पाठवावेत, असे आवाहन संस्थेने केले आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक- ०२०-२५४४९६४९/९७३०४९५५७३.