देशाच्या ग्रामीण भागामधील चांगल्या पण उपेक्षित कलाकारांचा शोध घेऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची मोहीम पुण्यातील एका हस्तकला कलाकाराने बुधवारपासून सुरू केली. ‘मिशन इंडिया : २०१५-१६ सर्च फॉर रूरल हँडीक्राफ्ट टॅलेन्ट’ या नावाने सुरू केलेल्या या भारत भ्रमण यात्रेद्वारे सात महिन्यांमध्ये (२१८ दिवस) तब्बल ५० हजार किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे.
पुण्यातील हस्तकला कलाकार प्रशांत पाडवे यांनी ही यात्रा सुरू केली आहे. कुमावत क्षत्रीय संघटनेचे अयक्ष राजेंद्र नाईक यांच्या हस्ते झेंडा दाखवून शनिवारवाडय़ापासून या यात्रेला सुरुवात झाली. पाडवे हे ठाणे मार्गे डहाणूकडे रवाना झाले आहेत. संपूर्ण भारत, नेपाळ, भूतान मिळून एकूण ६५० जिल्ह्य़ांना भेट देऊन ते अधिकाधिक ग्रामीण कलाकारांचा शोध घेणार आहेत. आठवडय़ातील सहा दिवस दररोज ३०० किलोमीटर असा त्याचा मोटरसायकलवरून प्रवास असेल. २१८ दिवसांच्या प्रवासानंतर ते १२ मे २०१६ रोजी पुण्यात परतणार आहेत. हस्तकलाकारांचा शोध घेण्याबरोबरच त्यांच्या कलाकृतींची छायाचित्रे काढून त्याचे संकलन केले जाणार आहे. ‘यात्रेच्या पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे हे कार्य पूर्ण करण्यासाठी ऊर्जा वाढली आहे,’ असे त्यांनी सांगितले.
याबाबत पाडवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या प्रवासात आपण देशाच्या विविध भागातील जास्तीत जास्त कलाकारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांना भेटून माहिती संकलित करून त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचा आपला उद्देश आहे. ग्रमीण कलाकारांनी भारताची सांस्कृतिक परंपरा व कलेचा वारसा समृद्ध केला आहे. पण त्यांच्या कलाकृतींचा योग्य तो मोबदला, प्रशंसा आणि आवश्यक ती ओळख त्यांना मिळत नाही. ते करण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष भेटणे गरजेचे आहे. हे लक्षात आल्यामुळे आपण भारतभ्रमण करून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे ठरविले.
या प्रवासात पाडवे हे कलाकारांची माहिती गोळा करण्यासोबतच त्यांच्या कलाकृती विकतही घेणार आहेत. यात्रा संपल्यानंतर पुढील वर्षी दिवाळीपासून महानगरांमध्ये या कलाकृतींची प्रदर्शने भरवण्यात येतील आणि या कलाकृतींना व्यासपीठ, ग्राहक मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही पाडवे यांनी सांगितले.

पहिल्याच दिवशी जव्हार भागातील रामखिंड गावातील सुभाष कंडू यांची भेट झाली. ते ‘पेपर मॅशी’ पासून आदिवासी हस्तकला तयार करतात. त्यांनी बनविलेल्या आदिवासी बाहुल्या आणि इतर कला साहित्य ते मध्यस्थाला विकून उदरनिर्वाह करतात. हे मध्यस्थ या कलाकृती मोठय़ा किमतीला महानगरांमध्ये विकतात. ग्रामीण भागातील अशा कलाकारांना त्यांच्या कलेचे मोल माहीत नसते. तसेच, बाजारपेठही उपलब्ध नसते. त्यामुळे त्यांना कलेची योग्य किंमत मिळत नाही, असा अनुभवही पाडवे यांनी सांगितले.