पावसाने ओढ दिल्याने हंगाम लांबणीवर

पुणे : परराज्यातील मटारच्या तुलनेत पुरंदर तालुका तसेच नगर जिल्ह्य़ातील पारनेर तालुक्यातील मटार चवीला गोड असतो. मटार उसळीसाठी पुरंदर, पारनेरमधील मटारचा वापर गृहिणी करतात. पुरंदर आणि पारनेरमधील मटारचा हंगाम सुरू झाला असून ग्राहकांकडून मटारला चांगली मागणी आहे.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात कर्नाटकातील चिकमंगळूर, धारवाड येथून मटारची आवक सुरू आहे. मार्केट यार्डात पुरंदर, पारनेरमधील मटारच्या १०० गोणींची आवक नुकतीच झाली. घाऊक बाजारात पुरंदर, पारनेरमधील दहा किलो मटारला ७५० ते ७५० रुपये असा भाव मिळाला. किरकोळ बाजारात या मटारची प्रतिकिलो १०० रुपये दराने विक्री केली जात आहे. करोनाचा संसर्गामुळे शहरातील उपाहारगृहे, खाणावळी बंद आहेत. त्यामुळे परराज्यातील मटारच्या मागणीत घट झाली आहे. उपाहारगृहचालकांकडून परराज्यातील मटारला चांगली मागणी असते. घरगुती ग्राहकांकडून पुरंदर, पारनेरमधील मटारला चांगली मागणी असते. येत्या काही दिवसांत स्थानिक मटारची आवक आणखी वाढेल, अशी माहिती मार्केट यार्डातील विक्रेत्यांनी दिली.

जुलै महिन्यात पारनेर मटारचा हंगाम सुरू होतो. सप्टेंबर अखेरीपर्यंत स्थानिक मटारची आवक सुरू असते. यंदा पावसाने ओढ दिल्याने स्थानिक मटारचा हंगाम आठवडाभर लांबणीवर पडला आहे. हंगामाच्या सुरुवातीला आवक कमी होत असून येत्या काही दिवसांत स्थानिक मटारची आवक वाढेल, अशी माहिती मार्केट यार्डातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

मटार उसळीचा बेत

पुरंदर, पारनेरमधील मटार चवीला गोडसर असतो. मटार उसळ तसेच मसाले भातासाठी गृहिणी या मटारचा वापर करतात. दरवर्षी श्रावण महिन्यात या मटारचा हंगाम सुरू झाल्यानंतर गृहिणींकडून मटार उसळीचा बेत आखला जातो.