अरबी समुद्रात सध्या निर्माण झालेल्या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची प्रगती सुरू आहे. येत्या गुरुवापर्यंत (१३ जून) ते तळ कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दाखल होण्याची शक्यता आहे.

सध्या तीव्र उष्म्याने होरपळत असलेल्या आणि दुष्काळी स्थिती निर्माण झालेल्या विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मोसमी पावसाचे आगमन लांबणीवर पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मोसमी वाऱ्यांचे भारतातील आगमण यंदा उशिराने झाले आहे. ८ जूनला ते केरळ आणि तमिळनाडूच्या दक्षिण भागात दाखल झाले होते. एक आठवडय़ाहून अधिक विलंबाने केरळमध्ये पोहोचलेल्या मोसमी वाऱ्यांची सद्य:स्थितीतील प्रगती चांगली असली, तरी समुद्रातील घडामोडी त्यावर प्रभाव टाकू शकतात. मोसमी वाऱ्यांनी केरळमधील कोची, तमिळनाडूतील मदुराईपर्यंत मजल मारत सोमवारी ईशान्य भारतातील राज्यांसह संपूर्ण केरळ, तमिळनाडूच्या आणखी काही भागांत प्रगती केली आहे.

दक्षिण महाराष्ट्रात वेगाने पोहोचल्यानंतर मोसमी वारे कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा आणखी काही भाग व्यापू शकतील. मात्र, कमी दाबाची प्रणाली उत्तरेकडे सरकल्यानंतर मोसमी वाऱ्यांचे प्रवाह कमी होणार असल्याने उर्वरित राज्यातील त्यांची प्रगती मंदावणार आहे. त्यामुळेच विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यंमध्ये मोसमी पावसाचे आगमण लांबणार आहे.

कोकणात मुसळधार

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मंगळवारी (११ जून) कोकणात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सागरी किनाऱ्यावर ताशी ४५ किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने वारे वाहणार असल्याने कोकणातील काही जिल्ह्यंमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरुपाचा पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावणार आहे. त्याचप्रमाणे विदर्भात पुन्हा उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.