साधारण वेळेपेक्षा तब्बल दीड ते दोन आठवडे उशिराने मार्गक्रमण होत असलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या राज्यातील आगमनाकडे डोळे लागलेल्या नागरिकांसाठी आनंदवार्ता आली आहे. पोषक स्थिती असल्याने मोसमी वारे २० ते २१ जूनदरम्यान दक्षिण कोकणातून राज्यात प्रगती करणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सोमवारी जाहीर केले. कोकणातील प्रवेशानंतर तीन ते चार दिवसांत मोसमी वारे राज्याचा इतर भाग व्यापतील अशी शक्यता आहे.

अंदमानमध्ये नियोजित वेळेच्या आसपास १८ मे रोजी पोहोचलेल्या मोसमी वाऱ्यांच्या प्रवासात यंदा अनेक अडथळे आले. त्यामुळे केरळपर्यंतच्या प्रवासावरही परिणाम झाला. केरळमध्ये आठवडाभर उशिराने म्हणजे ८ जूनला मोसमी वारे पोहोचले. त्यानंतर त्यांची प्रगती वेगाने होईल, असे वाटत असतानाच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तीव्र होऊन त्याचे ‘वायू’ चक्रीवादळात रूपांतर झाले. चक्रीवादळाचा प्रभाव वाढल्यानंतर त्याने मोठय़ा प्रमाणावरील बाष्प खेचून नेले. त्यामुळे मोसमी वाऱ्यांचे प्रवाह कमकुवत होऊन त्यांचा प्रवास थांबला होता. त्यामुळे पुन्हा विलंब झाला. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर मोसमी वाऱ्यांचे प्रवाह पुन्हा निर्माण होऊन त्यांचा उत्तरेकडील प्रवास सुरू झाला.

सद्य:स्थितीत मोसमी पावसाने तमिळनाडू, कर्नाटकचा बहुतांश भाग व्यापला आहे. सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या उत्तर भागातही ते दाखल झाले आहेत. मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी सध्या पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांचा प्रवास वेगाने सुरू झाला आहे.

पूर्वमोसमी जोरदार बरसण्याची शक्यता

राज्यात सध्या तुरळक ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावतो आहे. मात्र मोसमी पावसाच्या आगमनापूर्वी काही दिवस विशेषत: कोकण विभागामध्ये पूर्वमोसमी पाऊस जोरदार बरसण्याची शक्यता आहे. १९ जूनला कोकणात विविध ठिकाणी आणि मुंबई परिसरात पूर्वमोसमी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याबरोबरच २० ते २१ जूनला मेघगर्जनेसह जोरदार वारा वाहण्याची शक्यता आहे.