कात्रज घाटातील टेकडय़ा फोडल्याच्या व अनधिकृत बांधकाम केल्याच्या प्रकरणात आरोपी असलेला राठोड याच्यावर शनिवारी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे-सातारा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील शिंदेवाडी येथे अठरा मीटर जागेवर अतिक्रमण केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.
किसन राठोड आणि पंडित राठोड या बंधूंविरुद्ध याआधीच गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानंतर आता राठोडवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. रिलायन्स कंपनीच्या पी.एस. टोल कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मल्हारी सुखदेव बंडगर यांनी याबाबत तक्रार दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रादेशिक नगररचना अधिनियम १९५६ चे कमल ८ (ब) अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग-चार हा रस्ता सहा पदरी करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी रिलायन्स कंपनीच्या पी एस टोल कंपनीने ७२५ ते ८६५ किलोमीटर दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी (एनएचआय) करार केला आहे. या रस्त्यावर शिंदेवाडी परिसरात ‘एनएचआय’ ने संपादन केलेल्या जागेवर राठोड बंधूंनी अठरा मीटरमध्ये अतिक्रमण केले. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजगड पोलीस तपास करत आहेत.
कात्रज टेकडीवर अनधिकृत बांधकाम केल्याच्या आरोपावरून यापूर्वीच राठोड बंधूंवर दाखल झालेल्या गुन्ह्य़ात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात किसन राठोड याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, पंडित राठोड याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.