राष्ट्रीय क्रमवारीत राज्यातील शिक्षणसंस्थांचे द्वितीय स्थान

शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र देशात आघाडीवर असल्याचा डंका राज्य सरकारकडून पिटला जात असला, तरी राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीत (एनआयआरएफ) त्याचे प्रतिबिंब पडलेले नाही. या यादीत सर्वसाधारण आणि विद्यापीठ या दोन्ही गटात महाराष्ट्र द्वितीय स्थानी असून, सर्वाधिक २१ संस्थांसह तामिळनाडूने आघाडी घेतली आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ही यादी नुकतीच जाहीर केली. त्यात शैक्षणिक संस्थांमधील सोयी, सुविधा, संशोधन, विद्यार्थ्यांना मिळालेली नोकरी आदी मुद्दय़ांचा विचार करून ही क्रमवारी जाहीर करण्यात येते.

सर्वसाधारण गटात महाराष्ट्रातील आयआयटी बॉम्बे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आयसर पुणे, इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई, होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट मुंबई, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, पुणे, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ, पुणे, नरसी मूनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, पुणे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी), दत्ता मेघे इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस, वर्धा या संस्थांचा समावेश आहे.

झाले काय?  देशभरातील शिक्षण संस्थांनी क्रमवारीसाठी माहिती पाठवली होती. त्यातून सवरेत्कृष्ट संस्थांचा यादीत समावेश करण्यात आला. सर्वसाधारण आणि विद्यापीठ गटात महाराष्ट्रातील अनुक्रमे बारा आणि अकरा संस्थांचा समावेश झाला. तर तामिळनाडूच्या २१ संस्था दोन्ही गटात समाविष्ट आहेत. सर्वसाधारण गटात नऊ  शिक्षण संस्थांसह उत्तर प्रदेशने तृतीय स्थान मिळवले. तर विद्यापीठ गटात तृतीय स्थानी असलेल्या कर्नाटकच्या १० शिक्षण संस्था आहेत.

तमिळनाडूचे वर्चस्व..

केंद्र सरकारने सुरू केलेल्या अटल रँकिंग ऑफ इन्स्टिटय़ूशन फॉर इनोव्हेशनमध्येही तमिळनाडूच आघाडीवर आहे. या गटातील तमिळनाडूच्या एकूण चार संस्थांचा समावेश आहे. त्यात खासगी तीन आणि एका सरकारी संस्थेचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी आणि आयआयटी बॉम्बे या दोनच संस्थांना या यादीत स्थान मिळाले.