बरे झालेल्यांनीही नियम पाळण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

पुणे : महापालिके च्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या काही आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा करोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे एकदा संसर्ग होऊन गेल्यानंतर नागरिकांनी गाफील राहणे योग्य नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

पुणे महापालिके चे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी याबाबत माहिती दिली. डॉ. वावरे म्हणाले,‘दुसऱ्यांदा संसर्ग झालेले रुग्ण महापालिके च्या आरोग्य विभागात कार्यरत आहेत. तिन्ही रुग्ण महिला असून त्यांचे वय ३५ ते ४० वर्षांच्या दरम्यान आहे. पहिल्या संसर्गातून बरे झाल्यानंतर एक-दोन महिन्यांनंतर या कर्मचाऱ्यांना पुन्हा करोनाचा संसर्ग झाला. रुग्णसेवेच्या निमित्ताने सातत्याने रुग्णांच्या निकट सहवासात आल्यामुळे या कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा संसर्ग झाला. दोन्ही वेळा के लेल्या करोना चाचणीत आढळलेल्या विषाणूच्या जनुकीय तुलनेतून दोन्ही वेळा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.’

करोना विषाणू संसर्ग होऊन गेल्यानंतर या रुग्णाच्या शरीरात तयार होणारी करोना प्रतिपिंडे किती काळापर्यंत राहातात याबाबतचे ठोस निष्कर्ष अद्याप काढण्यात आलेले नाहीत. मात्र एकदा करोनातून बरे झालेले रुग्ण मुखपट्टीचा वापर, हात धुण्याची सवय, शारीरिक अंतर राखणे या सवयींबाबत पुरेसे गंभीर नसल्याचे दिसून येते. त्याबाबत नाराजी तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे साथरोग तज्ज्ञ डॉ. अतुल मुळे म्हणाले,‘जगभरातून दुसऱ्या संसर्गाची उदाहरणे समोर येत आहेत, त्यामुळे दुसऱ्यांदा करोना होतो की नाही हा प्रश्नच आता उरलेला नाही. महाराष्ट्रात दिसणारी उदाहरणे प्रामुख्याने डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये आहेत. चिंतेची गोष्ट म्हणजे दुसऱ्यांदा संसर्ग झालेल्या रुग्णांना पहिल्यापेक्षा गंभीर त्रासांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे सर्वसामान्य, विशेषत: जोखमीच्या गटातील नागरिकांनी मुखपट्टी, स्वच्छता, शारिरीक अंतराचे नियम पाळणे आवश्यक आहे.’

करोनातून बरे झालात, तरी नियम पाळाच!

* एकदा करोना होऊन गेला म्हणून गाफील राहू नका.

* बरे वाटल्यानंतरही शक्य तेवढी विश्रांती घ्या.

* मुखपट्टी वापरा. गर्दीची ठिकाणे टाळा.

* अशक्तपणा, धाप लागणे, छातीत दुखणे अशा तक्रारी दिसल्यास

* डॉक्टरांचा सल्ला घ्या.

* रक्तदाब, हृदयविकार, कर्क रोग, मधुमेह असे आजार असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता नियमित उपचार घ्या.