पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे  (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०चा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यात ३ हजार २१४ उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली असून, मुख्य परीक्षेची अधिसूचना स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० लांबणीवर पडली होती. मात्र उमेदवारांनी सातत्याने के लेल्या मागणीनंतर २१ मार्चला राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर उमेदवारांचे पूर्व परीक्षेच्या निकालाकडे लक्ष लागले होते. या पाश्र्वभूमीवर पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी आयोगाने संकेतस्थळावर जाहीर के ली आहे. त्यात सर्वाधिक उमेदवार १ हजार ७२ उमेदवार पुणे येथील असल्याचे दिसून येत आहे.  त्याखालोखाल औरंगाबाद येथील २४१, नाशिक येथील २२०, कोल्हापूर येथील १६९, अहमदनगर येथील १७७ उमेदवार आहेत. तसेच प्रवर्गनिहाय पात्रता गुणही जाहीर करण्यात आले आहेत.

‘नीट-यूजी’ परीक्षा वेळापत्रकानुसारच 

नवी दिल्ली : १२ सप्टेंबरला होणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश चाचणी (नीट- यूजी) परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. आपण या प्रक्रियेत हस्तक्षेप करू इच्छित नाही आणि परीक्षेचे वेळापत्रक  बदलणे ‘अत्यंत अनुचित’ ठरेल, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. विद्यार्थ्यांना अनेक परीक्षांना बसायचे असेल, तर त्यांना प्राधान्य निश्चित करावे लागेल आणि त्यातून निवड करावी लागेल, कारण परीक्षांच्या तारखांबद्दल प्रत्येकजण समाधानी राहील अशी परिस्थिीत कधीच असणार नाही, असे न्या. अजय खानविलकर, हृषीकेश रॉय व सी.टी. रविकुमार यांच्या खंडपीठाने सांगितले.