News Flash

स्वबळाची भाषा.. पण तयारीचे काय?

स्वबळावर लढायचे, तर तयारीचे काय, अशी विचारणा काँग्रेसचे पदाधिकारी खासगीत करत असून खरोखरच स्वबळावर लढायचे असेल, तर वेळीच काय ते सांगा. घोषणा सोपी आहे;

| July 26, 2014 03:25 am

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह पक्षाच्या अन्य नेत्यांनीही स्वबळाची भाषा सुरू केल्यामुळे पुण्यात काँग्रेसमधील इच्छुकांमध्ये संमिश्र भावना व्यक्त होत आहे. स्वबळावर लढायचे, तर तयारीचे काय, अशी विचारणा काँग्रेसचे पदाधिकारी खासगीत करत असून खरोखरच स्वबळावर लढायचे असेल, तर वेळीच काय ते सांगा. घोषणा सोपी आहे; पण कोथरूड, पर्वती, वडगावशेरी आणि खडकवासला मतदारसंघांत काँग्रेसने लढायचे, तर लगेच तयारी सुरू करावी लागेल, याकडेही नेत्यांचे लक्ष वेधले जात आहे.
पुण्यात झालेल्या काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात सन्मानपूर्वक आघाडी झाली, तर ठीक. अन्यथा स्वबळावर लढू अशी भाषा सर्व नेत्यांनी केली. त्यामुळे पुणे शहर काँग्रेसमध्येही स्वबळाची चर्चा जोरात सुरू झाली आहे. खरोखरच काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला तर काय होईल, याचे आडाखे आता रंगवले जात आहेत. पुण्यातील कसबा, शिवाजीनगर आणि कॅन्टोन्मेंट आणि शेजारचा हडपसर हे चार विधानसभा मतदारसंघ गेल्यावेळी काँग्रेसच्या वाटय़ाला आले होते, तर पर्वती, कोथरूड, वडगावशेरी आणि खडकवासला हे मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेले होते. काँग्रेसने आता स्वबळाची भाषा सुरू केल्यामुळे आणि खरोखरच तसा निर्णय झाला, तर राष्ट्रवादीकडे असलेल्या चार मतदारसंघांमध्ये काँग्रेसला तातडीने ताकद लावावी लागेल.
पर्वतीमधून शहराध्यक्ष अभय छाजेड, नगरसेवक आबा बागूल हे काँग्रेसचे प्रबळ दावेदार आहेत. तसेच महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे यांचेही नाव चर्चेत आहे. कोथरूडमध्ये दीपक मानकर यांची तयारी आहे, तर वडगावशेरीमधून माजी आमदार चंद्रकांत छाजेड, तसेच संगीता देवकर, सुनील मलके यांची नावे चर्चेत आहेत. स्वतंत्र लढण्याचा निर्णय घ्यायला नेत्यांनी उशीर केला, तर तयारीला तेवढा वेळ कमी मिळेल. या तिन्ही मतदारसंघांत लढायचे, तर तातडीने काही बांधणी करावी लागेल. कारण काँग्रेससाठी हे नवे मतदारसंघ आहेत. त्यामुळे स्वबळाची घोषणा वाटते तेवढी सोपी नाही, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुण्याचा काही भाग समाविष्ट असलेले हडपसर आणि खडकवासला या मतदारसंघांतील खडकवासला राष्ट्रवादीकडे आहे, तर हडपसर काँग्रेसकडे आहे. राष्ट्रवादीच्या विरुद्ध खडकवासल्यातून लढायचे झाल्यास देखील काँग्रेसला तातडीने तयारी सुरू करावी लागणार आहे.
इच्छुकांमध्ये संभ्रमच
विधानसभा निवडणूक तयारीसाठी तसेच इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी काँग्रेसचे निरीक्षक रामलालजी सोळंकी १४ जुलै रोजी येथे येऊन गेले होते. पक्षाच्या नेत्यांनी स्वबळाची भाषा सुरू केली असली, तरी सोळंकी यांनी मात्र आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसकडे येणाऱ्या कसबा, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट आणि शेजारच्या हडपसर या मतदारसंघांतील इच्छुकांच्याच मुलाखती घेतल्या होत्या. त्यामुळे इच्छुकांमध्ये अद्यापही संभ्रमच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 3:25 am

Web Title: self congress willing slogan election
टॅग : Congress,Election
Next Stories
1 प्लँचेट प्रकरणाचा तपास अतिरिक्त पोलीस महासंचालकांमार्फत सुरू
2 कागदवेचक कर्मचाऱ्यांच्या मुलांची शिष्यवृत्ती रोखली
3 कलेद्वारे अर्थ देणाराच खरा प्रतिभावंत – पं. हृदयनाथ मंगेशकर
Just Now!
X