महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा (टंकलेखन आणि लघुलेखन)  २ ते ६ फेब्रुवारीदरम्यान घेण्यात येणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा होत असल्याने करोनाची लागण झाल्यास परीक्षा परिषद त्यासाठीचा खर्च देण्यास बांधील नाही, अशा आशयाचे स्वयंघोषणापत्र उमेदवारांना द्यावे लागणार आहे.

महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांत मिळून १४१ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. परीक्षेची प्रवेशपत्रे परिषदेच्या संकेतस्थळावर संस्था लॉग-इनद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.  तसेच परीक्षेसंदर्भातील सूचनाही देण्यात आल्या आहेत. ओळखपत्रात काही सुधारणा असल्यास संबंधित संस्थाचालकांनी (विद्यार्थ्यांचा फोटो व ओळखपत्रासह) समक्ष परीक्षा परिषदेच्या कार्यालयात येऊन प्रवेशपत्रावर सक्षम प्राधिकाऱ्यांची स्वाक्षरी आणि शिक्का घेतल्यानंतरच संबंधित विद्यार्थ्यांला परीक्षा देता येईल. परीक्षा सुरू झाल्यानंतर दुरुस्ती केली जाणार नसल्याचे परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी स्पष्ट केले आहे.

परीक्षेसाठी उमेदवारांकडून घेतल्या जाणाऱ्या स्वयंघोषणापत्राचा नमुनाही परिषदेने प्रसिद्ध केला आहे. त्यात स्वेच्छेने परीक्षा देत असून मला करोनाची लागण झालेली नाही किंवा करोनासदृश लक्षणेही नाहीत. मला करोनाची लागण झाल्यास त्यापोटी येणारा वैद्यकीय खर्च देण्यास परीक्षा परिषद बांधील नसल्याचे घोषणापत्र उमेदवाराला द्यावे लागणार आहे.