17 February 2019

News Flash

जीएसटी दर कपातीनंतरही पूर्वीच्याच दराने अनेक वस्तूंची विक्री

व्यापारी आणि उद्योजकांच्या सूचनांवरुन काही वस्तूंवरील २८ टक्के जीएसटी कर बदलून तो १८ टक्के करण्यात आला.

ग्राहक पेठचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांची केंद्राकडे तक्रार

वस्तू आणि सेवा करातील (गुडस् अ‍ॅन्ड सव्‍‌र्हिस टॅक्स- जीएसटी) दरांमध्ये कपात झाल्यानंतर वस्तूंच्या किमती कमी होणे अपेक्षित होते. मात्र काही परदेशी कंपन्या दरामध्ये कपात न करता पूर्वीच्याच दराने वस्तूंच्या किमती ग्राहकांकडून वसूल करत असल्याची तक्रार केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.

अखिल ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि ग्राहक पेठचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जीएसटी दरामध्ये कपात केल्यानंतर संबंधित वस्तूंच्या किमतींमध्ये बदल झाल्याचे न आढळल्यास ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे तक्रार करण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.

त्यानुसार काही परदेशी कंपन्यांची तक्रार केली असल्याचे पाठक यांनी सांगितले. ते म्हणाले, भारत ही सर्वच कंपन्यांच्या दृष्टिकोनातून मोठी बाजारपेठ आहे. या कंपन्या आपल्या देशातील नागरिकांची फसवणूक करुन आíथक लूट करीत आहेत. व्यापारी आणि उद्योजकांच्या सूचनांवरुन काही वस्तूंवरील २८ टक्के जीएसटी कर बदलून तो १८ टक्के करण्यात आला. त्यानंतर संबंधित वस्तूंच्या किमतींमध्ये घट होणे अपेक्षित होते. परंतू अनेक कंपन्या आधीप्रमाणेच किमती आकारत आहेत.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने ग्राहक पेठेमार्फत या सर्व प्रकाराची पडताळणी केल्याचे पाठक यांनी सांगितले.

प्रसार माध्यमांमध्ये १५ नोव्हेंबर २०१७ पूर्वी परदेशी कंपन्यांनी दिलेल्या जाहिराती आणि १५ नोव्हेंबर २०१७ नंतर त्याच कंपन्यांच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये संबंधित वस्तूंचे दर एकसारखेच आढळले आहेत. तर या वस्तूंची खरेदी केल्यावर १५ नोव्हेंबरला झालेल्या जीएसटी दरातील कपातीनंतर संबंधित वस्तूंच्या मूळ किमतीमध्ये वाढ करुन अंतिम किंमत मात्र तीच ठेवण्यात आली आहे. जीएसटी दर २८ टक्के वरुन १८ टक्के झाल्यावर ग्राहकांना १० टक्के दर कपातीचा फायदा होणे अपेक्षित असताना बहुराष्ट्रीय कंपन्यांनी जीएसटी दर १८ टक्के दाखविला. मात्र संबंधित वस्तूंची मूळ किंमत १० टक्के वाढवून अंतिम किंमत तीच ठेवण्यात आली आहे. यातून बहुराष्ट्रीय कंपन्यांचे उखळ पांढरे होत असल्याचे पाठक यांनी म्हणाले.

असे वाढवले दर

व्हॅसलिन मॉइश्चरायझर व सर्फ एक्सेलच्या १५ नोव्हेंबर पूर्वी व त्यानंतरच्या किमतीमध्ये खालीलप्रमाणे तफावत आढळून आली आहे. व्हॅसलिन मॉइश्चरायझरची (४०० मि.ली.) १५ नोव्हेंबर पूर्वी अधिकतम विक्री किंमत २३५ रुपये होती. मूळ किंमत १६६ रुपये ९ पैसे आणि त्यावर २८ टक्के जीएसटी लावल्यानंतर त्याची किंमत २१३ रुपये ६३ पैसे अशी होती. आता १५ नोव्हेंबर नंतर जीएसटी १८ टक्के झाला आणि याच वस्तूच्या मूळ किमतीमध्ये वाढ करुन ती १८१ रुपये ५ पैसे करण्यात आली. त्यावर १८ टक्के जीएसटी लावून त्याची किंमत पूर्वीइतकीच म्हणजेच २१३ रुपये ६३ पैसे इतकी ठेवण्यात आली आहे आणि अधिकतम विक्री किंमत रुपये २३५ अशीच आहे. सर्फ एक्सेल इझी वॉश १ किलोची १५ नोव्हेंबरपूर्वी अधिकतम विक्री किंमत ११२ रुपये होती. मूळ किंमत रुपये ८१ रुपये २ पैसे आणि त्यावर २८ टक्के जीएसटी लावल्यानंतर त्याची किंमत रुपये १०३ रुपये ६३ पैसे होती, आता १५ नोव्हेंबरनंतर जीएसटी १८ टक्के झाल्यावर याच वस्तूच्या मूळ किमतीमध्ये वाढ करुन ती ८७ रुपये ८९ पैसे झाली. त्यावर १८ टक्के जीएसटी लावून त्याची किंमत पूर्वीइतकीच म्हणजे १०३ रुपये ७१ पैसे इतकी आहे आणि अधिकतम विक्री किंमत ११२ रुपये आहे. हीच परिस्थिती लॅक्मे, पॉण्डस, डव, सनसिल्क, सर्फ एक्सेल इत्यादी अनेक वस्तूंच्या किमतींमध्ये आढळली आहे.

First Published on December 7, 2017 3:37 am

Web Title: selling many items at the same rate after the gst rate cut