भीतीपोटी गर्दी आणि सामाजिक अंतराला हरताळ

पुणे : टाळेबंदी लागू होण्याच्या आदल्या दिवशी पुन्हा खरेदीसाठी झुंबड उडाली. किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी चढय़ा भावाने विक्री केली. तुलनेत आवक अपुरी पडत असल्याने भाज्यांची चढय़ा भावाने विक्री झाली, अशी माहिती किरकोळ बाजारातील भाजी विक्रेत्यांनी दिली.

टाळेबंदी मंगळवारपासून (१४ जुलै) होत आहे. दहा दिवसांच्या टाळेबंदीत पहिले पाच दिवस किराणा माल दुकाने, भाजीपाला विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत. या काळात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून संचारबंदी, वाहतूक बंदीच्या आदेशाची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानंतर निर्बंध काहीसे शिथिल करण्यात येणार असून सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत भाजीपाला, दूध, जीवनावश्यक वस्तू, किराणा माल विक्रीची दुकाने खुली ठेवण्यात येणार आहेत.   महात्मा फुले मंडई, मार्केटयार्डातील मुख्य भाजीपाला बाजार तसेच किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांच्या दुकानांच्या परिसरात खरेदीसाठी झुंबड  उडाली होती. मुखपट्टीचा वापर केला असला तरी गर्दी वाढल्याने सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमाला हरताळ फासण्यात आल्याचे अनेक ठिकाणी आढळून आले.  मध्यभागात, पूर्वभागात रात्रीपासून बांबूचे अडथळे उभे करण्यात आल्याने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली.

मार्केटयार्ड, उपबाजार बंद

टाळेबंदीत मार्केटयार्डातील मुख्य भाजीपाला बाजार, गूळ आणि भुसार बाजार बंद राहणार आहे. त्यामुळे किरकोळ किराणा माल विक्रेत्यांनी सोमवारी खरेदीसाठी गर्दी केली होती. पुढील आदेश येईपर्यंत घाऊक बाजार बंद राहणार आहे.

कोथिंबीरवगळता पालेभाज्यांना फारशी मागणीदेखील नव्हती. पुन्हा टाळेबंदीचा निर्णय लागू केल्यानंतर खरेदीसाठी गर्दी होऊ लागली. भाजीपाल्याच्या दरात गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत वाढ झाली.   नागरिकही भीतीपोटी खरेदीसाठी गर्दी करत आहेत.

– प्रकाश ढमढेरे, भाजीपाला विक्रेते, किरकोळ बाजार