स्मार्ट सिटी योजना राबवण्यासाठी विशेष हेतू कंपनी (स्पेशल पर्पज व्हेईकल- एसपीव्ही) स्थापन करण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या खास सभेत गुरुवारी बहुमताने मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावाला राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने पाठिंबा दिला, तर काँग्रेस आणि मनसेने विरोधात मतदान केले. अखेर ८५ विरुद्ध ४५ अशा मतांनी एसपीव्ही स्थापन करण्याचा प्रस्ताव सभेत मंजूर झाला. त्यामुळे एसपीव्ही स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
एसपीव्ही स्थापनेबाबतचा निर्णय घेण्यासाठी बोलावलेली सभा सुरू होताच काँग्रेस आणि मनसेच्या नगरसेवकांनी अनेक आक्षेप घेतले. काँग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे, अभय छाजेड, संजय बालगुडे, मनसेच्या वनिता वागसकर, किशोर शिंदे, वसंत मोरे, बाळा शेडगे, भाजपच्या माधुरी सहस्त्रबुद्धे, शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार आदींेची सभेत भाषणे झाली. एसपीव्ही स्थापन करणे म्हणजे महापालिकेच्या काही अधिकारांवर गदा आणण्यासारखे आहे. त्यामुळे काही अटी वगळाव्यात अशी काँग्रेसची मुख्य मागणी होती. स्मार्ट सिटीला आमचा विरोध नाही, मात्र एसपीव्हीला विरोध आहे, असे अरविंद शिंदे म्हणाले.
एसपीव्हीमध्ये राजकीय प्रतिनिधी असले तरी त्यांना अंमलबजावणीचा कोणताही अधिकार नाही, याकडे संजय बालगुडे यांनी लक्ष वेधले. या कंपनीच्या निमित्ताने आपण एक छोटी पालिका तयार करत आहोत. याबाबत नागरिकांच्या सूचना घेताना त्यांना कर लावणार आहोत का, अतिरिक्त कर आहेत का हे सांगितले असते, तर कदाचित नागरिकांकडून वेगळ्या सूचना आल्या असत्या. या कंपनीमुळे शहराच्या सर्व भागात विकास होणार नाही. महापालिकेने पूर्वी मोठे प्रकल्प केले आहेत. त्यामुळे वेगळ्या कंपनीची गरज नाही, असे अभय छाजेड म्हणाले.
ही कंपनी स्थापन झाल्यानंतर नागरिकांवरील कर वाढणार आहेत का, हा नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे नागरिकांवरील कर वाढवले जाणार आहेत का याचा प्रथम खुलासा करावा अशी मागणी वनिता वागसकर यांनी केली.
या भाषणांनंतर प्रस्तावावर मतदान पुकारण्यात आले. मूळ प्रस्तावाला काही उपसूचना देण्यात आल्या होत्या. दोन वर्षांनंतर कंपनीने अपेक्षेप्रमाणे काम केले नाही तर एसपीव्ही कंपनी बंद करावी आणि ती बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्यानंतर अंतिम निर्णय राज्य शासनाने तीन महिन्यात घ्यावा, अशी उपसूचना शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार आणि भाजपच्या मुक्ता टिळक यांनी दिली होती. ती सभेत एकमताने मंजूर झाली. या उपसूचनेसह अन्य दोन उपसूचना मंजूर करून एसपीव्ही स्थापनेच्या प्रस्तावाला सभेत बहुमताने मंजुरी देण्यात आली.