भारतातील रेडिओ खगोलशास्त्राचे उद्गाते आणि ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरुप यांचं पुण्यात निधन झालं. डॉ. गोविंद स्वरुप हे भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक मानले जातात. अलाहाबाद मधून १९५० मध्ये विज्ञानाची मास्टर्स पदवी संपादन करुन डॉ. स्वरुप यांनी १९५२ मध्ये ऑस्ट्रेलियामधील सी.एस.आर. ओ. येथे खगोलशास्त्रविषयक कार्य सुरु केलं. सिडनी जवळच्या पॉट्स हिल येथे सहा फूट व्यासाच्या Parabolic अँटेना उभारण्यात त्यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता.
डॉ. गोविंद स्वरुप यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातली पहिली आधुनिक रेडिओ दुर्बीण मुंबईजवळच्या कल्याणमध्ये उभारण्यात आली. या दुर्बिणीच्या मदतीने सूर्याची निरीक्षणं घेण्यात आली. डॉ. गोविंद स्वरुप यांनी दक्षिण भारतातल्या उटी येथेही रेडिओ दुर्बीण उभारली. उटी येथील दुर्बिणीच्या यशानंतर महाराष्ट्रातील पुण्यापासून ८० किमी अंतरावर असलेल्या खोडद-नारायणगाव येथे जगातलील दुसऱ्या क्रमांकाची महाकाय दुर्बीण उभारण्याचं काम त्यांनी केलं.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी शालेय स्तरावर चांगले विज्ञान शिक्षक निर्माण व्हायला पाहिजेत या मताचे ते होते. भारतीयांकडे विज्ञानाची दृष्टी आहे, मात्र अमलबजावणीत आपण मागे पडतो. त्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विज्ञान कार्यशाळा व्हायला हव्यात अशीही गरज त्यांनी बोलून दाखवली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 7, 2020 10:38 pm