|| भक्ती बिसुरे

समुपदेशकांचा मर्यादित वापराचा इशारा :- स्मार्टफोन या एका जादुई यंत्राच्या रूपाने माहिती आणि मनोरंजनाचा खजिना अक्षरश प्रत्येकाच्या हातात येऊन पडला आहे. त्याचा अतिरेकी वापर करून त्याचे व्यसन लावून घेण्यात मुले आणि तरुणांच्या बरोबरीने ज्येष्ठ नागरिक देखील आघाडीवर असल्याचे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशकांकडून नोंदवण्यात येत आहे.

गेल्या पाच ते सहा वर्षांत इंटरनेट हे प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले आहे. नव्या तंत्रज्ञानाशी ओळख करून घेण्याच्या उत्सुकतेपोटी अनेक ज्येष्ठ नागरिक देखील स्मार्टफोनचा वापर सहज करतात. परदेशातील मुले किंवा नातवंडांशी संवाद साधण्यासाठी हे स्मार्टफोन उपयुक्त ठरतात. त्यावर इंटरनेट वापरताना अडथळा येऊ नये यासाठी वायफाय कनेक्शन घेतले जाते. घरात संवाद साधण्यासाठी कोणीही नसल्याने तो स्मार्टफोन हेच त्यांचे विश्व होते. त्यामुळे दिवसाचे चोवीस तास समाजमाध्यमांतील ग्रुपवर उपलब्ध असणे, आलेले संदेश कोणतीही खातरजमा न करता पुढे पाठवणे, सतत बातम्या, गाण्यांचे व्हिडीओ मोठय़ा आवाजात पाहात बसणे अशा अनेक गोष्टी ज्येष्ठ नागरिक करतात.

समुपदेशक सोनाली काळे म्हणाल्या,की अनेक घरांत ज्येष्ठ दाम्पत्ये एकटी राहतात. त्यांच्याशी संवाद साधायला कोणी नसते. त्यामुळे स्मार्टफोन, त्यावरचे ग्रुप आणि त्यावरून होणारे मनोरंजन हाच त्यांचा दिनक्रम असतो. स्मार्टफोनच्या अतिरेकी वापरामुळे पाठ आणि मानेच्या दुखण्यांची सुरुवात होते. वायफाय किंवा पुरेसे नेटवर्क नसेल तर चिडचिडेपणा देखील दिसून येतो.

समुपदेशक पर्णिका कुलकर्णी आपले निरीक्षण नोंदवताना म्हणाल्या,की स्मार्टफोनच्या आहारी गेलेले अनेक ज्येष्ठ नागरिक दिसतात. त्यांच्या स्मार्टफोन वापराच्या प्रमाणामुळे आजी-आजोबा म्हणून नातवंडांशी त्यांचा संवाद संपला आहे. गोष्ट सांगणे, भरवणे अशा आजी-आजोबांकडून आवडीने केल्या जाणाऱ्या गोष्टींचे प्रमाण कमी होत आहे. इंटरनेटचा प्लॅन संपत आल्यानंतर घरातील सदस्यांना रिचार्ज करायला सांगितले जाते, मात्र ते विसरल्यास त्यावरून वाद घालणारे ज्येष्ठ नागरिक आहेत.

कुटुंब समुपदेशनादरम्यान कुटुंबातील सदस्यांकडून या गोष्टींबाबत माहिती मिळते. ज्येष्ठ नागरिकांमध्ये स्मार्टफोनचा वापर अतिरेकी आहे हे खरे. त्याचबरोबर, पोर्नोग्राफी पाहण्याचे प्रमाण देखील लक्षणीय असल्याचे निरीक्षण आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे अजय दुधाणे यांनी नोंदवले.

गृहिणींचे ऑनलाईन शॉपिंग

नव्या आणि स्मार्ट व्यसनांमध्ये गृहिणींचे ऑनलाईन शॉपिंग विसरून चालणार नाही. कुटुंबातील सदस्य कामासाठी घराबाहेर पडल्यानंतर गृहिणींसाठी त्यांचा स्मार्टफोन हाच सोबती असतो. इंटरनेट वापरताना सतत उघडणाऱ्या ऑनलाईन शॉपिंगच्या खिडक्या त्यांना मोहात पाडतात. त्यातून खरेदी सुरू होते. क्रेडिट कार्डचे बिल पाहून घरात कमावणाऱ्या एकटय़ा पतीला या नव्या धोक्याची जाणीव झाल्याने त्याने पत्नीच्या समुपदेशनाची मागणी केली, अशा अनेक केसेस येतात, असा अनुभव अजय दुधाणे यांनी सांगितला.