दुय्यम दर्जाच्या यंत्रांमुळे आधार जोडणी करताना ज्येष्ठ नागरिकांचे हाल

मोबाइल कंपन्या, बँका तसेच अन्यही अनेक ठिकाणी आधार कार्ड ‘लिंक’ करणे सक्तीचे करण्यात आल्यामुळे ही प्रक्रिया करण्यासाठी नागरिक सातत्याने प्रयत्नशील आहेत. मात्र आधार कार्ड काढलेले असूनही बोटांचे ठसे जुळत नसल्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत असून आधार सक्तीमुळे ज्येष्ठ नागरिक हवालदिल झाले आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या बोटांचे ठसे एका संगणीकय प्रणालीत जुळत नसल्याचे सांगण्यात येत असतानाच दुसऱ्या यंत्रावर मात्र ते जुळतात. त्यामुळे मोबाइल कंपन्यांकडे असलेल्या आधार ‘लिंक’ करण्याच्या यंत्रांबाबतच शंका निर्माण झाली आहे.

जिल्ह्य़ात आधार केंद्रांची संख्या कमी आहे. त्यातच प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी आधार कार्ड ‘लिंक’ करणे केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे. खासगी मोबाइल कंपन्यांनीही आधार कार्ड जोडणी बंधनकारक केली आहे. पुनर्पडताळणीसाठी (री-व्हेरिफेकेशन) आधार कार्डची झेरॉक्स आणि बोटांचे ठसे घेतले जात आहेत. मात्र यात हजारो ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मोबाइल कंपन्यांच्या मनमानी कारभाराचा फटकाही नागरिकांना बसत आहे. त्यामुळे एकीकडे आधार केंद्रांची तसेच चालकांची अपुरी संख्या आणि दुसरीकडे आधार असूनही ठसे जुळत नसल्यामुळे दुहेरी त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आधार कार्डची जोडणी करण्यासाठीची यंत्र केंद्र शासनाकडून प्रमाणित करण्यात आली आहेत. तसा दावाही केला जात आहे. मात्र काही ठिकाणी असलेल्या यंत्रांवर बोटांचे ठसे जुळत नसल्याचे तर काही ठिकाणी जुळत असल्याचे आढळून आले आहेत. एका वरिष्ठ निवृत्त सरकारी अधिकाऱ्याला त्याचा अनुभव आला. त्यांनी हा अनुभव ‘लोकसत्ता’ला सांगितला.

एका खासगी मोबाइल कंपनीशी आधार लिंक करण्यासाठी त्यांच्या बोटांचे ठसे घेण्यात आले. मात्र ते जुळत नसल्यामुळे महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आधार केंद्रात जाऊन तिकडे त्याबाबतची माहिती द्यावी आणि आधार कार्डबाबतची पुढील कार्यवाही करावी, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या एका यंत्रावर बोटांचे ठसे जुळतात का, याची तपासणी केली. त्या वेळी त्या यंत्रावर त्यांच्या बोटांचे ठसे जुळले. त्यामुळे बायोमॅट्रिक प्रणाली अंतर्गत ठसे घेण्यासाठी कशा प्रकारची यंत्र वापरली जातात, याची माहिती त्यांनी मिळविली. तेव्हा त्यांना यात दोन प्रकारची यंत्र असून शंभर टक्के अचूकता असलेल्या यंत्रांचे प्रमाणीकरण करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे मोबाइल कंपन्यांकडे असलेल्या यंत्रांबाबत साशंकता निर्माण झाली आहे. मोबाइल कंपन्यांकडे असलेली दुय्यम प्रतीच्या यंत्रांबरोबरच प्रशिक्षित चालकांचा अभाव हे कारणही त्यामागे असू शकते, असे त्यांनी सांगितले.

पुनर्पडताळणी करण्यासंदर्भात अनेक प्रश्न

मोबाइल कंपन्यांनी पुनर्पडताळणीसाठी आधार जोडणी बंधकारक केली आहे. यापूर्वी आधार नसताना लाखो नागरिकांकडून मोबाइल कार्ड घेण्यात आली होती. त्या वेळी पुनर्पडताळणी करावी, असे का वाटले नाही आणि केवळ आधार कार्ड जोडणी हाच त्यासाठी एकमेव पर्याय असू शकतो का, अन्य मार्गाने पडताळणी करता येऊ शकत नाही का, असे प्रश्न विचारले जात आहेत.