News Flash

विभाजित स्वरूपात नष्ट व्हायचे का?

ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांचा सवाल

ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांचा सवाल

पुणे : रस्त्यावर, गल्लीत आणि दिल्लीत साचून राहिलेल्या दहशतीच्या मळभाबाबत प्रतीकात्मक संवाद दबक्या आवाजात ऐकू येत आहेत. दहशत, भीती, आतंक साहित्यामध्ये काही प्रमाणात उपाहासात्मकरीत्या मांडले जात असले तरी अभिव्यक्तीचा संकोच करून घेत सगळीकडे चतुर मौन बाळगले जात आहे. निर्थक भांडणांत गुंतवून समाजाची विभागणी करण्याचे कारस्थान आखले जात आहे. विभाजित स्वरूपात आपण नष्ट व्हायचे का? असा सवाल ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांनी शुक्रवारी उपस्थित केला.

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित २० व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात सासणे बोलत होते. राज्य शासनाच्या मराठी भाषा समितीचे अध्यक्ष आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. महापौर मुरलीधर मोहोळ, संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे, उपाध्यक्ष राजेंद्र वाघ, सचिव वि. दा. पिंगळे या वेळी उपस्थित होते.

सासणे म्हणाले, सध्याच्या राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतराबाबतही थेट किंवा अप्रत्यक्षपणे भारतीय साहित्यिकांनी सूतोवाच केले आहे. समाजाला शोषणमुक्त, भ्रष्टाचारमुक्त आणि दहशतमुक्त वातावरण हवे आहे. सर्वसामान्यांचे दु:ख मांडणारे साहित्यिक हरवले आहेत. मनोरंजनात्मक साहित्याचा भडिमार होत आहे. सर्वसामान्यांचा चेहरा पुन्हा प्रस्थापित करणे ही साहित्यिकांची जबाबदारी आहे. भ्रमयुगातून आपली सुटका करून घेत वास्तववादी समाजरचनेकडे वाटचाल केली पाहिजे.

आडमुठेपणा..

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यामध्ये केंद्र सरकार आडमुठेपणाची भूमिका घेत असून मराठी भाषा समितीचा अध्यक्ष या नात्याने मी या विषयाचा विविध स्तरांवर पाठपुरावा करणार आहे, असे चेतन तुपे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 12:35 am

Web Title: senior literature bharat sasane 20th literary artists conference zws 70
Next Stories
1 पुण्यात दिवसभरात आढळले ३११ नवे करोना रुग्ण तर पिंपरीत १११ नवे रुग्ण
2 ‘देवेंद्रजी मी पुन्हा कोल्हापूरला जाणार’ चंद्रकांत पाटील यांची घोषणा
3 ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागता कामा नये – वडेट्टीवार
Just Now!
X