ज्येष्ठ समीक्षक आणि मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव यांचे आज सकाळी सहा वाजता पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
मराठी साहित्यक्षेत्रात प्रा. रा. ग. जाधव यांनी भरीव व मोलाची कामगिरी केली. औरंगाबाद येथील २००४ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी लिहिलेली ‘निळी पहाट’, ‘संध्यासमयीच्या गुजगोष्टी’, ‘समीक्षेतील अवतरणे’, ‘साठोत्तरी मराठी कविता व कवी’, ‘साहित्य व सामाजिक संदर्भ’, ‘साहित्याचे परिस्थितीविज्ञान’ आदी अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. गेल्याचवर्षी प्रा. रा.ग. जाधव यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
अष्टपैलू समीक्षक गमावला – मुख्यमंत्री
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रा. ग. जाधव यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वाने एक महत्त्वाचा अष्टपैलू लेखक-समीक्षक गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, प्रा. जाधव यांनी मराठी साहित्यातील समीक्षेला नवी दिशा दिली. केवळ समीक्षाच नव्हे, तर एकूणच मराठी साहित्यविश्व समृद्ध करणारे लिखाण त्यांनी केले. त्यांची ‘निळी पहाट‘, ‘संध्यासमयीच्या गुजगोष्टी’, ‘समीक्षेतील अवतरणे’, ‘साठोत्तरी मराठी कविता व कवी’, ‘साहित्य व सामाजिक संदर्भ’, ‘साहित्याचे परिस्थितीविज्ञान’ अशी अनेक पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत. त्यांनी विविध साहित्य प्रकार समर्थपणे हाताळले. त्यांचे ग्रंथ साहित्याच्या अभ्यासकांना सदैव मार्गदर्शक ठरतील. मराठी विश्वकोशाच्या निर्मितीत त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या निधनाने केवळ अभ्यासू समीक्षकच नव्हे, तर अभ्यासू प्राध्यापकही आपण गमावला आहे.