पुणे शहराने राखीव साठय़ातील अर्धा टीएमसी पाणी दौंड आणि इंदापूरला सोडण्याचा निर्णय पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता घेतला आहे. त्यांच्या निर्णयाचा शहराच्या पाणीपुरवठय़ावर विपरीत परिणाम होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि मनसे या पक्षांनी पालकमंत्र्यांच्या निर्णयाला विरोध केला आहे. त्यामुळे या विषयात आपण लक्ष घालावे अशी विनंती महापौर प्रशांत जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.
पुणे शहराने गेले आठ महिने दोन टीएमसी पाण्याची बचत केली आहे. महापालिकेने ३१ जुलपर्यंत पाणीपुरवठय़ाचे नियोजन केले होते. दौंड आणि इंदापूरसाठी खडकवासला धरण साखळीमध्ये अर्धा टीएमसी पाणी शिल्लक आहे. ते पाणी देण्याबाबत महापालिकेची कोणतीही हरकत नाही. मात्र पुणे शहराच्या वाटय़ातील अर्धा टीएमसी पाणी कालव्याने सोडण्याचा निर्णय पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता घेतला आहे. त्याचा शहराच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार आहे, असे महापौर जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
‘दौंडला टँकरने पाणीपुरवठा करा! दौंड आणि इंदापूरला कालव्याद्वारे एक टीएमसी पाणी दिल्यास पाण्याची चोरी होण्याची शक्यता आहे. बाष्पीभवनामुळे पाणी मोठय़ा प्रमाणात वाया जाईल. कालव्याव्दारे पाणी पुरवठा केल्यास दौंड व इंदापूरला पाणी पोहोचणार नाही. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करावा.
दौंड शहरासाठी रेल्वे किंवा टँकरने पाणी पुरवठा केल्यास ३१ जुलपर्यंत पिण्याच्या पाण्याची समस्या येणार नाही. त्यासाठी आवश्यक निधी किंवा टँकर पुरविण्यास महापालिका तयार आहे, असेही महापौरांनी या पत्रात नमूद केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
खडकवासला धरण साखळीमधून एक टीएमसी पाणी दौंड आणि इंदापूरला देण्याचा जो निर्णय झाला आहे त्याच्या निषेधार्थ महापौर प्रशांत जगताप, महापालिका सभागृहनेता शंकर केमसे, काँग्रेसचे गटनेता व विरोधी पक्षनेता अरिवद िशदे यांच्यासह राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नगरसेवकांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. पालकमंत्र्यांनी घेतलेला निर्णय मागे घेतला जावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.