प्राची आमले

समाजमाध्यमांचा वापर करत शहर सुशोभीकरणात भर टाकण्यासाठी तसेच स्वच्छता मोहिमा राबवून लहान-मोठय़ा कामांना चळवळीचे स्वरूप देण्याचे काम एका निवृत्त एअर कमांडरने करून दाखवले आहे. या कामासाठी त्यांनी समाजमाध्यमांचा सुयोग्य वापर केला आहे. अशा एका वेगळ्या कामाची ही ओळख.

समाजमाध्यमांच्या वापरातून होणारे सकारात्मक काम कोणते, असा विचार केला तर आपल्या डोळ्यांसमोर अगदीच मोजके पर्याय उभे राहतात. स्वच्छ भारत या चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या अभियानातून प्रेरणा घेऊन शहरात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवतानाच नवीन पिढीसमोर आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न पुण्यात केला जात आहे. या मोहिमेसाठी समाजमाध्यमांचा वापर करण्यात येतो. समाजात स्वच्छतेबाबत सक्रियता निर्माण करण्याचा प्रयत्न ‘स्वच्छ पुणे स्वच्छ भारत’ हा गट करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वर्षांपूर्वी स्वच्छता मोहिमेची घोषणा केली. त्या मोहिमेपासून प्रेरणा घेत ‘स्वच्छ पुणे स्वच्छ भारत’ची मोहीम पुनीत शर्मा यांनी सुरू केली.

एअर कमांडर (निवृत्त) पुनीत शर्मा यांनी या उपक्रमाची सुरुवात फेसबुक पेजच्या माध्यमातून ९ ऑक्टोबर २०१४ साली सुरू केली. शर्मा यांनी वायू सेनेतून निवृत्ती घेतल्यानंतर समाजासाठी काहीतरी काम करायचे ठरवले होते. आपल्या धावपळीच्या आयुष्यातून देखील समाजसेवेसाठी सदैव नेहमी पुढे असणारे शर्मा अनेक युवक-युवतींचे प्रेरणास्थान आहेत.

शर्मा म्हणातात, स्वच्छता मोहिमेची सुरुवातच फेसबुक पेजच्या माध्यमातून झाली आहे. त्यामुळे एका छोटय़ा उपक्रमाला चळवळीचे स्वरूप देण्याचे हे काम समाजमाध्यमांतून झाले आहे. रेल्वे स्थानकावर सतत बाहेर गावांहून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी कायमच असते. चहाच्या टपरीवर चहा पिऊन तेथेच ग्लास, पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थाचे वेष्टन फेकणाऱ्यांची संख्या देखील काही कमी नाही. फक्त योजनेच्या घोषणेने काही होणार नाही तर त्यासाठी आपण स्वत: एक पाऊल उचलणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने पहिली मोहीम रेल्वे स्थानकाच्या आवारात राबविण्यात आली.

या मोहिमेसाठी स्वत:च्या फेसबुक पेजवरून शर्मा यांनी या उपक्रमाविषयीची माहिती मित्रांना दिली आणि या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातून ‘स्वच्छ पुणे स्वच्छ भारत’ या ग्रुपची स्थापना झाली. ग्रुपच्या प्रत्येक उपक्रमाची माहिती, काम केल्यानंतरचा बदल अशी माहिती लोकांपर्यंत समाजमाध्यमातूनच पोहोचत गेली. त्यातून अनेक नागरिकया उपक्रमाला जोडले गेले. ग्रुपची माहिती लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर कॉग्निंजट गो ग्रीन, रोटरी क्लब, लेझी ह्य़ुमन्स, क्लीन हार्ट्स अशा अनेक संस्था ग्रुपला जोडल्या गेल्या आहेत.

शर्मा म्हणाले, ग्रुपमधील स्वयंसेवकांचा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप देखील आहे. या ग्रुपच्या माध्यमातून सलग चार वर्षे प्रत्येक रविवारी एक मोहीम राबविण्यात येते. मोहीम राबविताना अनेक स्वयंसेवक असे मिळाले, की ज्यांनी प्रेरणा घेत आता स्वत: ग्रुप सुरू करून शहरात विविध ठिकाणी काम सुरू केले आहे. शो मस्ट गो ऑन या वाक्याप्रमाणे एखाद्या रविवारी मी नसलो, तरी स्वयंसेवक व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप वर चर्चा करतात आणि मोहीम कोणताही खंड न पडता राबवितात. भारताचे भविष्य तरुण पिढी असून त्यांना सामाजिक भान देण्याची गरज आहे.

ग्रुपतर्फे शहरातील भिंती सुशोभित करणे, पर्यटनस्थळी, तसेच टेकडय़ा, बस, रेल्वे स्थानकांवर प्लास्टिक गोळा करणे, महानगरपालिकेच्या शाळांमध्ये रंगरंगोटी करणे, फ्लॅश मॉब असे अनेक उपक्रम राबविले जातात. या कामासाठी कोणाकडून कोणत्याही स्वरूपाची देणगी घेतली जात नाही.

ज्या संस्थांना शहरात काही उपक्रम राबवायचे असतील, त्या संस्थांना ग्रुपतर्फे मदत केली जात आहे. ज्या दिवशी प्रत्येक घरातील एक व्यक्ती स्वच्छतेसाठी स्वत: पुढाकार घेऊन काम करेल, त्या दिवशी कोणत्याही संस्था व योजनांची गरज समाजाला भासणर नाही. यासाठी तरुण पिढीमध्ये जागृती करणे आवश्यक असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

या कामात सहभागी होण्यासाठी ‘स्वच्छ पुणे स्वच्छ भारत’ या फेसबुक पेजच्या माध्यमातून माहिती घेता येईल.