पुण्यात दुचाकीच्या क्रमांकाची मालिका तीन अक्षरांच्या दिशेने

पुणे शहरामध्ये वाहनांची संख्या लोकसंख्येपेक्षाही अधिक झाली असून, त्यात दररोज शेकडो नव्या वाहनांची भर पडते आहे. दुचाकी वाहनांची संख्या त्यात सर्वाधिक असून, सद्य:स्थितीत दुचाकीच्या क्रमांकाची मालिका तीन अक्षरीच्या दिशेने चालली आहे. शहरात दररोज किमान एक हजार नव्या दुचाकी दाखल होत आहेत. दुचाकींची संख्या वाढण्याचा वेग पाहता पुणे हे देशातील सर्वाधिक दुचाकी असलेले शहर ठरते आहे.

अकार्यक्षम सार्वजनिक वाहतूक आणि शहरांतर्गत प्रवासाची गरज लक्षात घेता मागील काही वर्षांपासून शहरात खासगी वाहनांची संख्या झपाटय़ाने वाढत चालली आहे. पुण्याच्या लोकसंख्येपेक्षाही वाहनांची संख्या अधिक झाली आहे. त्यात रोजच शेकडोच्या संख्येने नव्या वाहनांची भर पडते आहे. त्यात दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात कोणत्याही शहराच्या तुलनेत पुण्यात दुचाकींची संख्या सर्वाधिक असून, सद्य:स्थितीत शहरातील रस्त्यांवर तब्बल २८ लाख दुचाकी धावत आहेत. दुचाकी क्रमांकाची एक मालिका अवघ्या दहा दिवसांत संपत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये वाहनांची नोंदणी करून वाहनाला क्रमांक दिला जातो. या क्रमांकामध्ये पहिली दोन इंग्रजी अक्षरे राज्याची ओळख असते. (उदा. एमएच- महाराष्ट्र) त्यानंतरचे दोन अंक संबंधित आरटीओचा क्रमांक असतो. (उदा. १२- पुणे) त्यानंतर इंग्रजी वर्णमालेनुसार दोन अक्षरांची मालिका आणि त्यानंतर चार अंकी क्रमांक असतो. एका मालिकेमध्ये ९९९९ वाहनांची नोंद केली जाते. एका इंग्रजी अक्षरातून २६ मालिका तयार होतात. पुणे शहरात दुचाकीसाठी ‘ए’ अक्षरापासून सुरू झालेली मालिका सध्या इंग्रजी वर्णमालेच्या अठराव्या अक्षरावर येणार आहे. सध्या ‘क्यू’ या अक्षराची मालिका संपत आली असून, येत्या काही दिवसांतच ‘आर’ या अक्षराची मालिका सुरू होईल. दुचाकींच्या वाढीचा वेग आणि दिवाळी, दसऱ्याला वाहनांच्या खरेदीचा दरवर्षी निर्माण होणारा नवा विक्रम पाहता उर्वरित नऊ अक्षरांच्या मालिका संपण्यास वेळ लागणार नाही.

इंग्रजी दोन अक्षरांची मालिका संपल्यानंतर पुढे काय, असा प्रश्न आहे. हा प्रश्न सर्वात प्रथम दुचाकींबाबत पुण्यातच निर्माण होणार आहे. सध्याच्या दोन अक्षरांची मालिका तीन अक्षरी करणे हा एक उपाय असला, तरी परिवहन विभागाकडून याबाबत एखादा दुसरा पर्यायही पुढे येऊ शकतो, असे मत प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. दिल्लीमध्ये मोटारींच्या बाबतीत हा प्रश्न निर्माण झाला होता. तेथे ‘कार’ या इंग्रजी शब्दाचे ‘सी’हे आद्याक्षर मालिकेपुढे लावून पुन्हा नव्याने मोटारींची मालिका सुरू करण्यात आली आहे.

दुचाकी नोदणीची मालिका संपण्यात काही वेळ असला, तरी त्या दिशेने पुणे शहर जात आहे. त्यामुळे याबाबत धोरणात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे मतही आरटीओतील अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आले.