26 January 2021

News Flash

लस प्रथम भारतीयांनाच!

कोव्हीशिल्ड लशीच्या वितरणाबाबत ‘सीरम इन्स्टिटय़ूट’ची ग्वाही

जानेवारीपासून दर महिन्याला करोना प्रतिबंधक कोव्हीशिल्ड लशीच्या दहा कोटी मात्रा (डोस) तयार करण्यात येणार असून लस सर्वात आधी भारतीयांनाच देण्यात येईल, अशी ग्वाही ‘सीरम इन्स्टिटय़ूट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी शनिवारी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सीरम इन्स्टिटय़ूटला भेट देऊन लस निर्मितीच्या प्रक्रियेचा आढावा घेतला. त्यानंतर पूनावाला यांनी पत्रकार परिषदेत लशीच्या निर्मितीबाबत माहिती दिली. पूनावाला म्हणाले, ‘‘सीरम सध्या दर महिन्याला लशीच्या ५ ते ६ कोटी मात्रा तयार करत आहे, जानेवारीपासून ही प्रक्रिया अधिक वेगवान होईल आणि प्रतिमहिना दहा कोटी मात्रा तयार केल्या जातील.’’

लशीच्या युरोप आणि अमेरिकेतील वितरणाची जबाबदारी अ‍ॅस्ट्राझेनेका ही कंपनी पार पाडणार असल्यामुळे सीरमचे प्राधान्य भारत आणि कोव्हॅक्स देशांतील वितरणाला असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी किं वा भारत सरकार यांच्याशी कोणताही लिखित करार झालेला नाही, मात्र जुलैपर्यंत तीन ते चार कोटी डोस भारत सरकार खरेदी करेल, अशी शक्यता पुनावाला यांनी वर्तवली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीमध्ये लसनिर्मितीची प्रक्रिया, त्याची साठवणूक आणि वितरण, त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि जागतिक स्तरावर उपलब्ध असलेल्या लशींचे संभाव्य फायदे आणि तोटे यांबाबत चर्चा झाल्याचे पूनावाला यांनी सांगितले.

प्रतिकारशक्ती निर्माण करण्यात यश – पूनावाला

लशीच्या सुरक्षिततेविषयी पूनावाला म्हणाले, चाचणीदरम्यान कोव्हीशिल्डचा डोस दिलेल्या स्वयंसेवकांमध्ये करोनाचा संसर्ग झाला असता त्याची लक्षणे अत्यंत सौम्य होती, असे आढळले. त्यामुळे कोणालाही रुग्णालयात दाखल करावे लागले नाही. लस घेतलेल्या स्वयंसेवकांमुळे विषाणूचा फैलावही झाला नाही. म्हणजेच त्यांच्यात ‘स्टरलायजिंग इम्युनिटी’ (रोगप्रतिकारक शक्ती) निर्माण झाली. ही बाब समाधानकारक आहे. कोव्हीशिल्ड लशीच्या सध्या प्रौढांमध्ये केलेल्या चाचण्या पुरेशा असल्यामुळे अतिरिक्त चाचण्या करण्याचा विचार नाही, मात्र कालांतराने १८ वर्षांखालील मुलांमध्ये लशीच्या चाचण्या करण्याचा विचारही त्यांनी बोलून दाखवला.

समाधानकारक चर्चा – पंतप्रधान

पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूटमध्ये अदर पुनावाला आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी समाधानकारक चर्चा झाली. लस निर्मितीबाबतची सद्यस्थिती आणि भविष्यकालीन प्रक्रिया यांबद्दल माहिती घेतली आणि लसनिर्मिती प्रकल्पालाही भेट दिली, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीरम भेटीनंतर केले.

जागृती करण्याची पंतप्रधानांची सूचना – डॉ. पुनावाला

पंतप्रधान मोदी यांनी सीरम इन्स्टिटय़ूटला भेट दिल्यानंतर लसनिर्मितीबद्दल तेथील संशोधकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. लस घेण्याच्या आवश्यकतेबद्दल लोकांमध्ये जागृती करण्याचे प्रयत्न करा, अन्यथा लोक त्याकडे दुर्लक्ष करतील, अशी सूचना पंतप्रधानांनी केली, असे सीरमचे अध्यक्ष डॉ. सायरस पुनावाला यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2020 3:23 am

Web Title: serum institute of india coronavirus vaccine mppg 94
Next Stories
1 पुण्यात मागील २४ तासात करोनाचे ५२८ तर पिंपरीत २१७ नवे रुग्ण
2 करोना लस: “येत्या दोन आठवड्यात तातडीच्या परवान्यासाठी सिरम अर्ज करणार”
3 कोविशिल्ड लशीबाबत अदर पुनावाला यांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले…
Just Now!
X