करोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लसीची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भीषण आग लागली आहे. केंद्र सरकारकडून ‘कोव्हिशिल्ड’ लसीच्या मर्यादित वापराला परवानगी देण्यात आली असून लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. फक्त भारतच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष सध्या सीरम इन्स्टिट्यूटकडे लागलं आहे. करोनाची लस बनवणारी जगातील सर्वात मोठी संस्था म्हणून सीरमकडे पाहिलं जातं. मात्र या आगीमुळे करोना लस निर्मितीवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहीती सीरमचे कार्यकारी अध्यक्ष अदर पूनावाला यांनी दिली आहे. अशा पद्धतीच्या अपघाताची शक्यता लक्षात घेऊन आधीपासूनच बॅकअप प्लॅन तयार करण्यात आल्याने त्याचा फायदा झाल्याचे पूनावाला यांनी म्हटलं आहे.

नक्की पाहा >> वयस्कर व्यक्तींऐवजी आधी मुलांना करोनाची लस देण्याची मागणी; जाणून घ्या कारण

सर्व सरकारी संस्था आणि लोकांना मी हे निश्चितपणे सांगू शकतो की कोव्हिशिल्डच्या निर्मितीला कोणताही फटका बसलेला नाही. कोव्हिशिल्डची निर्मिती अनेक इमारतींमध्ये केली जाते. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये अशी एखादी घटना घडलीच तर लस सुरक्षित रहावी म्हणून मी मुद्दाम अशाप्रकारची रचना करुन ठेवली आहे, अशी माहिती अदर पूनावाला यांनी ट्विटरवरुन दिली आहे. याच ट्विटमध्ये त्यांनी पुणे पोलीस आणि अग्निशमन दलाचे आभार मानले आहेत.

आग नक्की कुठं लागली?

मांजरी येथे सीरम इन्स्टिट्यूट या संस्थेचा कॅम्पस १०० एकरात पसरलेला आहे. या कॅम्पसमध्ये अनेक इमारती असून यापैकी  एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर आग लागली. हळूहळू ही आग चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत पसरली आहे. या कॅम्पसमध्ये सीरमकडून अनेक सुविधा उभारल्या जातत. सुदैवाने आग लागलेल्या ठिकाणापासून ‘कोव्हिशिल्ड’ लसीची निर्मिती होणारं ठिकाण थोड्या अंतरावर असून ते पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सीरमकडून सांगण्यात आलं आहे.

मांजरी येथे ज्या ठिकाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घेतली जाणारी बीसीजी लस तयार केली जाते त्या विभागाला आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. महत्वाचं म्हणजे करोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लस तयार केली जाते तेथून हा भाग काही अंतरावर आहे. सुदैवाने आगीची झळ तिथपर्यंत पोहोचलेली नाही. अग्निशमन दलाच्या १० गाड्यांमधून पाण्याचा मारा करण्यात आला. एक तासांच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यासाठी सुरु असणाऱ्या शर्थीच्या प्रयत्नांना यश आलं. अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारीदेखील घटनास्थळी उपस्थित होते. आग विझवल्यानंतर या ठिकाणी कुलिंग ऑप्रेशन सुरु आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून मोठ्या प्रमाणात आगीचे लोट दिसत होते. सीरमच्या प्रवेशद्वाराजवळ बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.