पैसे स्वीकारूनही ग्राहकाला इंटरनेट सुविधा न पुरविणाऱ्या ब्रॉडबॅण्ड सेवा क्षेत्रातील कंपनीला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. मंचाने निकालाची प्रत दिल्यानंतर संबंधित कंपनीने सहा आठवडय़ांच्या आत तक्रारदाराला पाच हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात, सदस्य मोहन पाटणकर आणि क्षितिजा कुलकर्णी यांनी दिले आहेत.
या संदर्भात दुष्यंत वसंतराव पाटील (रा. वडगांव बुद्रुक) यांनी यू ब्रॉडबॅण्ड इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या विरोधात चार मार्च २०१५ रोजी ग्राहक मंचात तक्रार दिली होती. पाटील यांना इंटरनेट सुविधा हवी होती. शिवाजीनगर परिसरात असलेल्या यू ब्रॉडबॅण्ड कंपनीक डे त्यांनी १४ जानेवारी रोजी इंटरनेट सुविधेची मागणी केली होती. त्यासाठी पाटील यांनी कंपनीकडे एक हजार ९७७ रुपये भरले. त्यानंतर १९ जानेवारी रोजी पाटील यांना आयडी क्रमांक, युझर नेम आणि सांकेतिक शब्द देण्यात आला. मात्र या प्रक्रियेनंतर त्यांचे इंटरनेट सुरू झाले नाही. त्यामुळे पाटील यांनी ग्राहक मंचात तक्रार दिली होती.
कंपनीने सुविधा न दिल्यामुळे नुकसान झाले असून मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागले. त्यामुळे कंपनीकडून पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी पाटील यांनी ग्राहक मंचाक डे केली होती. पाटील यांची तक्रार दाखल झाल्यानंतर ग्राहकमंचाकडून कंपनीला नोटीस पाठविण्यात आली. नोटीस पाठवूनही कंपनीकडून ग्राहक मंचात त्यांची बाजू मांडण्यासाठी कोणी उपस्थित राहिले नाही. त्यानंतर ग्राहक मंचाने पाटील यांच्या बाजूने निकाल देत सहा आठवडय़ांच्या आत कंपनीने तक्रारदाराला पाच हजार रुपये द्यावेत असे आदेश दिले. नुकसान भरपाईपोटी पन्नास हजारांची रक्कम अवास्तव असल्याचे मत मंचाने व्यक्त केले आहे.