महाविद्यालय, विद्यापीठात अधिव्याख्याता होण्यासाठी अनिवार्य असलेली राज्य पात्रता परीक्षा (सेट) आता २७ डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठीची सेट परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे  घेण्यात येते. यंदाची सेट परीक्षा २८ जूनला घेण्यात येणार होती. मात्र करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र परीक्षा कधी होणार याबाबत काहीच माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.

या पार्श्वभूमीवर सेट परीक्षा २७ डिसेंबरला घेण्यात येणार असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सोमवारी जाहीर करण्यात आले. http://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर परीक्षेबाबतची माहिती दिली जाणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.