पुणे शहरात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, मानाच्या अष्टविनायक गणपती मंडळामार्फत कोविडमुक्ती सेवा केंद्र फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू करण्यात आले आहे. या करोनामुक्ती केंद्रामध्ये एकाच वेळी ४०० रुग्णांची सोय केली जाणार आहे. अशी माहिती मंडळाच्या प्रमुखांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.

मानाचा पहिला श्री कसबा गणपती, मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती, मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती, मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती आणि प्रमुख गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती पुण्यातील या मानाच्या अष्टविनायक गणपती मंडळांना एकत्रित येऊन पुणे महापालिकेच्या सहकार्याने करोना केअर केंद्राची सुविधा उपलब्ध केली आहे.

याबाबत माहिती देण्याकरीता आयोजित पत्रकार परिषदेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी, श्री कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, श्री गुरूजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी, श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, पुनीत बालन, नितीन पंडित, संजय मते, प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

पुणे शहरातील वाढत्या करोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर फर्ग्युसन महाविद्यालय वसतिगृहात 400 रुग्णांकरिता आवश्यक बेड आणि 20 आॅक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. जे बाधित रुग्ण येथे उपचारासाठी दाखल होतील. त्या सर्वांना औषधांबरोबर आयुर्वेदिक काढा देखील देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांवर उपचारासाठी 12 तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टर चोवीस तास उपलब्ध असणार आहेत. प्रत्येक गोष्टीवर त्यांचे लक्ष राहणार आहे. आपला देश लवकरात लवकर करोनामुक्त व्हावा, अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी उपस्थित मंडळांनी केली. तसेच, शासनाच्या आदेशाचे पालन प्रत्येक मंडळाने आणि नागरिकांनी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.