पिंपरी बाजारपेठेतील राजकारण व अर्थकारण सर्वार्थाने अवलंबून असलेल्या सेवाविकास बँकेची पंचवार्षिक निवडणूक तोंडावर आली असून, बँकेवर ताबा मिळवण्यासाठी विद्यमान अध्यक्ष अमर मूलचंदाणी व त्यांचे कडवे प्रतिस्पर्धी आसवानी बंधू यांच्यातील डावपेचांना सुरुवात झाली आहे. बुधवारी मूलचंदाणी यांनी बँकेच्या इतिहासात ४२ वर्षे न झालेली वेतनवाढ जाहीर करून निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
मूलचंदाणी व आसवानी यांच्यातील संघर्ष व शहरातील बडय़ा नेत्यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागामुळे बँकेची निवडणूक दरवेळी लक्षवेधी ठरते. मूलचंदाणी यांचा पालिका निवडणुकीत डब्बू आसवानी यांच्याकडून दारुण पराभव झाल्याने बँक पुन्हा ताब्यात घेण्यासाठी त्यांनी आटापिटा चालवला आहे. एकामागोमाग कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. अध्यक्षपदाच्या साडेतीन वर्षांच्या कालावधीत मूलचंदाणींनी ११ नवीन शाखा सुरू केल्या आहेत. सेवा भवन हे बँकेचे स्वत:चे कार्यालय व ‘आरटीजीएस’ सुविधा सुरू केली आहे. आजमितीला बँकेची ११०० कोटींची उलाढाल असून ६५० कोटींच्या ठेवी आहेत व १० हजार सभासद आहेत. निवडणुका दोन महिन्यांवर आल्या असताना बँक व्यवस्थापन व कर्मचारी संघ यांच्यात वेतनकराराची अचूक वेळ साधण्यात आली आहे. बँकेत झालेल्या करारानुसार, सुमारे २०० कायम अधिकारी व कर्मचाऱ्यांना ३ ते १५ हजारांपर्यंतची वाढ मिळणार असून अन्य फायदेही मिळणार आहेत. बँकेच्या इतिहासातील ही सर्वाधिक वाढ असल्याची घोषणा मूलचंदाणी यांनी पत्रकार परिषदेत केली. या वेळी चंद्रशेखर अहिरराव, मनोहर मूलचंदाणी, टी. एन. लखानी आदी उपस्थित होते.