19 January 2021

News Flash

सेवासदन संस्थेच्या वसतिगृहातील एकावन्न मुलींना जेवणातून विषबाधा

सेवासदन संस्थेच्या वसतिगृहात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनी राहायला आहेत. त्यापैकी काही जणी नोकरदार आहेत.

| December 21, 2015 03:31 am

लक्ष्मी रस्त्यावरील सेवासदन संस्थेच्या वसतिगृहात राहणाऱ्या मुलींना शनिवारी रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एकावन्न मुलींना रात्री जेवण केल्यानंतर रविवारी पहाटे मळमळ, उलटय़ा सुरू झाल्या. या घटनेची माहिती रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर मुलींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी सतरा मुलींवर खासगी रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले. उर्वरित मुलींवर उपचार सुरू आहेत.
विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत भट यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवासदन संस्थेच्या वसतिगृहात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनी राहायला आहेत. सध्या वसतिगृहात १९६ मुली राहायला आहेत. त्यापैकी काही जणी नोकरदार आहेत. वसतिगृहातील भोजनाचे कंत्राट सुहास पेंडसे आणि भक्ती पेंडसे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. शनिवारी रात्रीच्या जेवणात गवारीची भाजी, कढी, भात, आमटी, पोळी असे पदार्थ होते. रात्रीचे जेवण केल्यानंतर रविवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास काही मुलींना उलटय़ा, मळमळ असा त्रास सुरू झाला. या मुलींनी संस्थेतील कर्मचाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिली. त्या वेळी रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिस उपनिरीक्षक संजय जाधव आणि कर्मचाऱ्यांनी मुलींना पोलिस व्हॅनमधून मुलींना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पाच रुग्णवाहिकेतून उर्वरित मुलींना दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, सदाशिव पेठेतील मनोज क्लिनिक, जोशी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले
सतरा मुलींना उपचारानंतर सोडण्यात आले. उर्वरित मुलींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा शशिताई किर्लोस्कर, सहायक पोलिस आयुक्त प्रवीण कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट दिली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
अन्नपदार्थाचे नमुने ताब्यात
सेवासदन संस्थेत शनिवारी रात्री करण्यात आलेल्या अन्नपदार्थाचे नमुने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. हे नमुने मुंबईतील रासायनिक विश्लेषण प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. रासायनिक अहवाल मिळाल्यानंतर पोलिस दोषींवर कारवाई करतील, असे विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत भट यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2015 3:31 am

Web Title: sevasadan hostel girls meal poisoning
टॅग Girls,Hostel,Meal
Next Stories
1 गुंड बापू नायर टोळीविरुद्ध जागा बळकाविण्याचा आणखी एक गुन्हा
2 छेड काढल्याचा जाब विचारल्याने कार्यालयाची जाळपोळ
3 विक्रीकर निरीक्षक पदाच्या उत्तरतालिकेत चुका असल्याची तक्रार
Just Now!
X