वारज्यातील सात वर्षांच्या एका मुलाचे अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक शारीरिक अत्याचार करून त्याला जखमी करण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. याप्रकरणी पोलीसांनी पाच जणांना अटक केली असून, त्यापैकी तिघेजण अल्पवयीन आहेत. अत्याचार करण्यात आलेल्या मुलावर सध्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी पोलीसांनी नितीन वेंकटेश भंडारी (२१) आणि रवि माणिक पवार (२३, दोघेही रा. लक्ष्मीनगर, कोथरूड) या दोघांसह तीन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. या पाच जणांनी मिळून संबंधित मुलाच्या छातीवर, तोंडावर आणि कानावर काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगा घराजवळील एका मंदिरात आरतीला गेला असताना, पाच जणांनी त्याचे अपहरण केले. त्याच्यावर बुधवारी रात्री सव्वा आठ ते साडेनऊच्या दरम्यान शारीरिक अत्याचार केले गेले. रात्री उशीरापर्यंत तो घरी परत न आल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री साडेनऊच्या सुमारास दोन मोटारसायकलस्वारांना हा मुलगा जखमी असून, रडत असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनीच या मुलाला मंदिरात आणले. यानंतर तो मुलगा बेशुद्ध पडल्यावर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.