शहरात आज कडेकोट बंदोबस्त

विसर्जन मिरवणुकीसाठी रविवारी (२३ सप्टेंबर) शहरातील प्रमुख सतरा रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता या प्रमुख विसर्जन मार्गासह शहरात आठ हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. प्रमुख विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.

विसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. सोमवारी विसर्जन मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात येईल.

विसर्जनासाठी बंद राहणारे प्रमुख रस्ते पुढील प्रमाणे- शिवाजी रस्ता (काकासाहेब गाडगीळ पुतळा चौक ते जेधे चौक), लक्ष्मी रस्ता (संत कबीर चौक ते टिळक चौक), बगाडे रोड (सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक), बाजीराव रस्ता (बजाज पुतळा ते फुटका बुरुज चौक), कुमठेकर रस्ता (टिळक चौक ते चितळे मिठाईवाले), गणेश रस्ता (दारूवाला पूल ते जिजामाता चौक), केळकर रस्ता (बुधवार चौक ते टिळक चौक), गुरू नानक रस्ता (देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक), टिळक रस्ता (जेधे चौक ते टिळक चौक), शास्त्री रस्ता (सेनादत्त पोलीस चौकी ते टिळक चौक), जंगली महाराज रस्ता (झाशीची राणी चौक ते खंडोजीबाबा चौक), कर्वे रस्ता (नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक), भांडारकर रस्ता (पीवायसी जिमखाना ते गोखले स्मारक चौक), फग्र्युसन रस्ता (खंडोजीबाबा चौक ते फग्र्युसन महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वार), पुणे-सातारा रस्ता (होल्गा चौक ते जेधे चौक), सोलापूर रस्ता (ढोले पाटील चौक ते जेधे चौक), प्रभात रस्ता (डेक्कन पोलीस ठाणे ते शेलारमामा चौक)

पिंपरीत वाहतुकीत बदल

पिंपरी-चिंचवड शहरात विसर्जन मिरवणुकीसाठी रविवारी दोन हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. विसर्जन मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजल्यानंतर पिंपरी परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. पिंपरीतील मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.संशयास्पद व्यक्ती तसेच बेवारस वस्तू आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी केले आहे. कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल तसेच बेकायदेशीर मद्यविक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी त्यांची वाहने साई चौक येथील भुयारी मार्गालगत असलेल्या मोकळ्या जागेत, पिंपरीतील भाजी मंडईनजीक, पिंपरी पुलानजीक असलेल्या मोकळ्या जागेत लावावीत. पिंपरीतील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीचा समारोप होईपर्यंत बदल लागू राहणार आहेत.

विसर्जन मिरवणुकीत ध्वनिवर्धक लावण्यास काही मंडळे आग्रही आहेत. उच्च न्यायालयाने ध्वनिवर्धकांवरील बंदी कायम ठेवली आहे. मिरवणुकीत ध्वनिवर्धकाचा वापर केल्यास तो न्यायालयाचा अवमान ठरेल. ध्वनिवर्धकाचा वापर केल्यास कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. पोलीस कायद्याच्या कक्षेत राहून काम करतील. कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून मिरवणूक उत्साहात पार पाडावी.

– के. वेंकटेशम, पोलीस आयुक्त