दिवाकर रावते यांचा एसटी कर्मचाऱ्यांना सल्ला

सातवा वेतन आयोग एसटी कर्मचाऱ्यांना लागू करा, अशी मागणी करण्यात येत असतानाच एसटीच्या कर्मचाऱ्यांनी या मृगजळामागे धावू नये, असा सल्ला परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिला आहे. शासनाशिवाय असलेल्या अंगीकृत महामंडळांच्या कामांची पद्धत वेगळी असल्याने त्यांना आयोग लागू होत नसल्याचे चवथ्या आणि पाचव्या वेतन आयोगामध्ये जाहीर केले आहे, असेही रावते यांनी स्पष्ट केले.

पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता रावते यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रावते म्हणाले, की वेतनवाढ व्हावी, यासाठी कर्मचारी आतुर आहेत. त्यासाठी आम्ही करार करायला तयार आहोत. चार वर्षांनी होणारा करार या वेळी दीड वर्षे लांबला आहे. तो तातडीने करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सातवा वेतन आयोग एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विषय होऊ शकत नाही. त्यांनी या मृगजळाच्या मागे धावू नये. कर्मचारी संघटना कोणतीही असली, तरी त्यातील कर्मचारी आमचाच आहे. त्या कर्मचाऱ्याच्या बाजूने करार करायचा असल्याचे न्यायालयाला सांगितले आहे.

न्यायालयाने कर्मचारी संघटनांना येत्या १३ तारखेला बाजू मांडण्यासाठी बोलावले आहे, असे रावते यांनी सांगितले.

मागील काही दिवसांमध्ये एसटीच्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे, असे विचारले असता रावते म्हणाले, की गेल्या दोन महिन्यांत एकाही मृताच्या वारसाला नुकसान भरपाईचे दहा लाख रुपये देण्याची वेळ एसटीवर आली नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमीच आहे.

अ‍ॅल्युमिनियमच्या गाडय़ांना अपघात होतात. त्यामुळेच आता लोखंडी गाडय़ांची निर्मिती केली आहे. त्यांची चाचणीही घेण्यात आली आहे. केंद्राची परवानी मिळाली, की या गाडय़ा एसटीच्या ताफ्यात दाफ्यात दाखल होतील.