देशाच्या रक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणारे शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या निवासस्थानी जाऊन तेथे शौर्य गुढी उभारण्याचा कार्यक्रम शुक्रवारी करण्यात आला.
शहर काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागूल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कर्नल महाडिक यांच्या सातारा जिल्ह्य़ातील पोगरवाडी येथील घरी शास्त्रोक्त पद्धतीने गुढी उभारण्यात आली. यावेळी कर्नल महाडिक यांच्या घराचा परिसर सुशोभित करण्यात आला होता. तसेच परंपरेप्रमाणे रांगोळीचे रेखाटन करण्यात आले. गुढी उभारताना कर्नल महाडिक यांच्या मातोश्री, बंधू विजय, मनोहर, जयवंत आणि मुलगा स्वराज उपस्थित होते. उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी देशाच्या रक्षणासाठी शौर्य दाखवणाऱ्या शहिदांच्या कर्तृत्वाला सलाम केला.
शालीवाहन राजाने आजच्याच दिवशी परकीय आक्रमणाला थोपवले होते. हा दिवस शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. आम्ही उभारलेली शौर्य गुढी हजारो तरुणांना लढण्याची प्रेरणा देणारी ठरणार आहे, असे बागूल यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाची संकल्पना माजी उपमहापौर आबा बागूल यांची होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय कांबळे, सागर आरोळे, भरत तेलंग, बाबालाल पोलके, अमर ससाणे, धनंजय साळुंके, राजेश देवेंद्र, अक्षय भरतवाड आदींनी उपक्रमाचे संयोजन केले.