विद्याधर कुलकर्णी

डफावर थाप मारून वीरश्रीयुक्त पोवाडय़ाचे गायन करणारी शाहिरी.. देशभक्त आणि राष्ट्रपुरुषांची चरित्रगाथा कथन करणारे नारदीय परंपरेतील कीर्तन.. नवी संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी अध्यापनाच्या माध्यमातून करीत असलेले ज्ञानदानाचे कार्य.. समाज प्रबोधनाच्या त्रिसूत्रीद्वारे कार्यरत असलेल्या शाहिरा प्रा. संगीता मावळे या आधुनिक नवदुर्गाच आहेत. त्यांच्यासह पती, मुलगी व मुलगा असे घरातील चौघेही ‘कुटुंब रंगलंय शाहिरीत’ हे वातावरण अनुभवत आहेत. हा सगळा प्रवास खडतर होता. पण, प्रबोधनाच्या माध्यमात काम करीत आहे, याचे समाधान आहे, अशी भावना मॉडर्न महाविद्यालयातील प्रा. संगीता मावळे यांनी व्यक्त केली. गेल्या तीन वर्षांपासून त्या संपदा सहकारी बँकेच्या संचालक म्हणून कार्यरत आहेत.

शाहीर हेमंत मावळे यांच्याशी विवाह होईपर्यंत शाहिरीतील ‘श’देखील मला माहीत नव्हता. मावळे यांचे गुरू शाहीर किसनराव िहगे हे माझेही शाहिरीतील गुरू आहेत. मात्र, त्यांच्या निधनानंतर पती हेच माझेही गुरू झाले. डेक्कन इन्स्टिटय़ूट ऑफ कॉमर्स येथे मी काही काळ अध्यापन करू लागले. मावळे यांनी ‘गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कॉमर्स’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला, तेव्हा मी त्यांना शिकवायला होते. एका अर्थाने आम्ही दोघे एकमेकांचे गुरू आणि एकमेकांचे शिष्य देखील आहोत, असा योगायोग मावळे यांनी सांगितला.

मी माहेरची संगीता कुलकर्णी. मूळची गोंदवल्याची. हेमंत मावळे यांच्या एका शाहिरी कार्यक्रमाला माझे मामा गेले होते. त्यांनी हे स्थळ सुचविले आणि १९९३ मध्ये आमचा विवाह झाला. विवाहानंतरच माझे शिक्षण पूर्ण झाले. गरवारे महाविद्यालयातून बी. कॉम., एम. कॉम. आणि मास्टर इन पसरेनेल मॅनेजमेंट (एमपीएम) केल्यानंतर पुणे पीपल्स बँकेत काम केले. पण, लिपिक म्हणून काम करण्यात मला रस नव्हता. ही नोकरी सोडून शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. डेक्कन इन्स्टिटय़ूट ऑफ कॉमर्स, इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सिंहगड इन्स्टिटय़ूट येथे काम केल्यानंतर गेल्या सात वर्षांपासून मॉडर्न महाविद्यालयात अध्यापन करीत आहे. या प्रवासामध्ये शाहिरीने सोबत केली.

कीर्तन कला

शाहिरी कलेबरोबरच कीर्तन शिकण्याची इच्छा पूर्ण केली. नारद विद्या मंदिरातून कीर्तन कौमुदी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. न. चिं. अपामार्जने व चारुदत्त आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्तन कला आत्मसात केली. ही वाटचाल सुरू असताना मला कुटुंबातील सर्वानी केवळ सहकार्य केले नाही तर, प्रोत्साहनही दिले. त्यामुळे मी आनंदी आहे, असेही त्या म्हणाल्या