शेक्सपीअरच्या श्रेष्ठ कलाकृतींवर आधारित चित्रपट पाहण्याची तसेच दिग्गजांकडून शेक्सपीअर समजून घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) आणि ‘इंग्लिश लँग्वेज टीचिंग इन्स्टिटय़ूट ऑफ सिंबायोसिस’ (एल्टिस) यांच्यातर्फे २२ ते २५ एप्रिल दरम्यान शेक्सपीअर चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम व एल्टिसचे शिरीष सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन होणार असून या दिवशी ‘ऑथेल्लो’ या कलाकृतीवर आधारित ‘कलीयट्टम’ हा मल्याळम चित्रपट दाखवला जाईल.
‘अंगूर, ‘इशकजादे’, ‘मॅकबेथ’, ‘ओमकारा’, ‘किंग लिअर’ आणि ‘हॅम्लेट’ हे चित्रपट शनिवारी व रविवारी एनएफएआयमध्ये पाहता येतील. सकाळी १० वाजल्यापासून हे चित्रपट दाखवले जातील. तर, शनिवारी दुपारी १ वाजता एल्टिस सभागृहात अकिरा कुरोसावाचा ‘थ्रोन ऑफ ब्लड’ पाहण्याची संधी आहे. सोमवारचे कार्यक्रम एनएफएआयमध्येच होणार असून दुपारी साडेतीन वाजता ‘मकबूल’ हा चित्रपट दाखवला जाणार आहे. सायंकाळी सहा वाजता समारोपाच्या सत्रात माधव वझे, विनय हर्डीकर, अनिल झणकर यांच्या व्याख्यानांमधून चित्रपटांमधील शेक्सपीअर समजून घेता येईल. ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टार या वेळी उपस्थित राहणार असून ते एकपात्री सादरीकरणही करतील.