News Flash

प्रेमाचे नाते

विविध प्राणी, पक्षी पाळण्याची अनेकांना हौस असते.

|| श्रीराम ओक

विविध प्राणी, पक्षी पाळण्याची अनेकांना हौस असते. काही वेळा मुलांची हौस म्हणूनदेखील प्राण्यांना, पक्ष्यांना घरी आणले जाते. पण त्यांची योग्य पद्धतीने निगा राखली न गेल्याने त्या प्राण्या-पक्ष्यांना विविध आजारांना तोंड द्यावे लागते. मग या आजारी जीवांना वाऱ्यावर सोडून दिले जाते. त्यावेळी त्यांना आसरा असतो तो सामाजिक कार्यकर्त्यांचा. ‘माणुसकी’ या शब्दाचे नाते जपत मुक्या जीवांना आत्मीयतेने बरे होण्यास सहाय्य करून त्यांना निसर्गात सोडून देणाऱ्या डॉ. शकुंतला मांडके. त्यांच्या या कार्यामुळे विविध प्रकारच्या प्राण्यापक्ष्यांना जीवनदान मिळाले आहे. अवघे पाऊणशे वयोमान असणाऱ्या डॉ. मांडके यांच्या कार्याविषयी..

प्रत्येक जीव जन्माला आला की, त्याची आपल्या अवतीभोवती असणाऱ्या मंडळींबरोबर विविध नात्यांशी नाळ जोडली जाते. जन्मदात्या आईबापाबरोबरच त्या दोघांच्या ओघानी येणारी इतर नाती, यातून जन्माला आलेला जीव नात्यांनी समृद्ध होत जातो. या नात्यामध्ये मनुष्यप्राण्याबरोबरच निसर्गातील इतरही नाती कळत नकळत जोडली जातात. मुके प्राणी, वृक्षवल्ली यांच्याबरोबरदेखील अनेकांचे नाते निर्माण होते आणि समृद्धही होते. निसर्गातील प्राणी, पक्षी हे घटक यामध्ये आलेच. काहींच्या जीवनात ते अभावाने तर काहींच्या जीवनात आवडीने येतात. ज्यांच्या जीवनात आवडीने येतात, ती मंडळी, त्यांचा अत्यंत प्रेमाने, मायेने सांभाळ करतात. कुत्र्यामांजरांना खाऊ-पिऊ घालणे, दुखले-खुपले तर पाहणे ही अनेकांची आवडही असते. काही वेळा मात्र या प्राण्यांनाही रस्त्याची वाट दाखवली जाते. या प्राण्यांबरोबरच खार, कावळा, कबुतर, घुबड, पोपट या प्राण्या-पक्ष्यांचा सांभाळ जसे कोणी करत नाही, तसेच ते जखमी झाले, आजारी पडले तर त्यांच्यावर उपचार करायला कोणी नसते. इतर वन्य पशुपक्ष्यांप्रमाणे ही मंडळी निसर्गाच्या वातावरणात राहूनच बरी होतात, हे जरी सत्य असले तरी शहरात अनेकदा त्यांना मदतीची गरज भासते आणि ती होते डॉ. शकुंतला मांडके यांच्या रूपाने.

माणसांच्या डॉक्टर असलेल्या डॉ. मांडके यांना मुक्या प्राण्याबद्दलचे प्रेम वाटू लागले ते त्यांची आई जानकीबाईंमुळे. इमारत बांधण्याच्या एका कामावर मजुरांबरोबरीने गाढवेदेखील काम करीत होती. मजूर मंडळींची पिण्याच्या पाण्याची सोय केली होती, पण त्या गाढवांच्या तहानेचे काय? हा विचार करून जानकीबाईंनी या गाढवांसाठी पाण्याची सोय केली. त्या नित्यनेमाने गाढवांना पाणी देऊ लागल्या. हे संस्कार घेतच शकुताई लहानाच्या मोठय़ा झाल्या. वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या. महाविद्यालयात जाण्यासाठी बसची वाट पाहात उभ्या असताना झाडावरून टपकन खाली काहीतरी पडले. आवाजाच्या दिशेने त्यांनी नकळत पाहिले. पहिल्यांदा त्यांच्या लक्षात आले नाही, पण नीट निरखून पाहिल्यानंतर ते खारीचे पिल्लू असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी पुढचा मागचा कोणताही विचार न करता, त्या पिल्लाला उचलले आणि आपल्या कोटाच्या खिशात ठेवले. त्याला घरी नेऊन त्याची शुश्रूषा केली. यथावकाश ते पिल्लू खडखडीत बरे झाले. डॉ. मांडके यांचे कार्य संपले होते. त्यांनी त्या पिल्लाला निसर्गात सोडून दिले, पुढच्या प्रवासासाठी.

शकुताई आणि त्यांच्या प्राणिप्रेमाची ही सुरुवात होती. महाविद्यालयीन जीवन संपवून त्यांनी भूकूम येथे दवाखाना सुरू केला. दवाखाना नवीनच असल्याने हवा तेवढा जम बसला नव्हता. तरीदेखील त्यांचे प्राणिप्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी दहा पैशांना एक बटर मिळे, अशी दोन रुपयांची बटर घेऊन एसटीसाठी वाट पाहात उभ्या असताना, त्या गावातील कुत्र्यांना खाऊ घालत. नित्यनेमाने त्यांचे हे काम चाले.

शकुताईंचा जीवनप्रवास जसा सुरू होता, तसेच त्यांचा प्राणिविश्वातील प्रवासदेखील जोमाने सुरू होता. रस्त्याने जाताना एका आजारी कुत्र्याला पाहून त्यांनी त्याची सेवासुश्रूषा करण्याचे ठरविले आणि जवळ पुरेसा पैसा नसतानाही, त्या अनोळखी प्राण्यासाठी प्राण्यांच्या दवाखान्यापर्यंत काही दिवस रिक्षाने प्रवास करीत, त्याला एकवीस सलाईनच्या बाटल्या लावत, इतर इंजेक्शन देत त्यांनी त्यालाही आजारातून बाहेर काढले. या प्राण्यांच्या वैशिष्टय़ांनुसार रंगांनुसार त्यांना नाव देणे, त्यांची आईच्या मायेने देखभाल करणे, त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळणे हे सगळे त्यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय आणि आपले रुग्ण तेवढय़ाच निष्ठेने सांभाळत केले. काळू असे नाव ठेवलेल्या एका कुत्र्याला डोक्यात जखम झाली होती. त्या जखमेत किडे पडले होते, हे किडे काढण्याचे काम रात्री नऊ ते पहाटे तीनपर्यंत डॉ. मांडके करीत होत्या. नंतर कापूर आणि हळद याचा वापर करीत घरगुती उपचार करून डॉ. मांडके यांनी काळूला ठणठणीत केले. रेशमासारखे मऊ केस असणाऱ्या रेशमी नावाच्या कुत्रीचे बाळंतपण मांडके यांच्या दहा बाय दहाच्या छोटय़ाशा खोलीत झाले आणि रेशमीसाठी, तिच्या पिल्लांसाठी तेच हक्काचे घर झाले. याशिवाय अनेक खारी, कावळा, कबुतर, घुबड इतकेच काय तर एम.आय.टी.कॉलेजच्या ओढय़ाजवळ पायाला नायलॉनची करकचून बांधलेल्या दोरीने आणि शक्तीहिन राजहंस एकदा शकुताईंच्या नजरेस पडला. त्यांनी त्याला घरी आणले आणि त्याचीदेखील सेवाशुश्रूषा केली.

त्यांना सापडलेले जखमी प्राणी जसे त्या घरी आणतात, तसेच अनेक ओळखीची मंडळीदेखील शकुताई अशा प्राण्यांसाठी जीवनदायिनी असल्याचे माहिती असल्याने त्या पशुपक्ष्यांना घेऊन येतात. त्यादेखील तेवढय़ाच प्रेमाने त्याची सेवासुश्रूषा करतात आणि त्यांना निसर्गात परत सोडून देतात. अनेक जखमी कुत्र्यांना बरे करून शकुताईंनी त्यांना घर मिळवून दिले आहे.

डॉ. मांडके यांचा एक पाय पोलिओमुळे अधू असून हिंडण्याफिरण्यावर बंधनेही आहेत. तरीदेखील त्यांच्या घरी अवचित येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार आपल्या छोटय़ाशा घरात आणि वयाच्या पंचाहत्तरीतही त्या अखंडपणे करीत आहेत, हे विशेष.

shriram.oak@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 1:06 am

Web Title: shakuntala mandke
Next Stories
1 मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या वाढीव दराचा पुण्यात मनसेकडून निषेध
2 पिंपरी-चिंचवडमध्ये पती पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या
3 पगडी असो किंवा पागोटे मी काढणार नाही, विक्रम गोखलेंचा शरद पवारांना टोला
Just Now!
X