अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी मागील कित्येक वर्षांपासून विहिंपकडून लढा आणि आंदोलन उभारले गेले आहे. अजूनही राम मंदिराची निर्मिती झालेली नाही. आता आम्ही काय जागतिक संघटनेकडे राम मंदिराच्या निर्मितीची मागणी करायची का? असा खोचक प्रश्न विश्व हिंदू परिषदेने उपस्थित केला आहे. विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपावर निशाणा साधला आहे. हिंदूंना राम मंदिरासाठी वायदा नको कायदा हवा असेही त्यांनी म्हटले आहे.

यावेळी शंकर गायकर म्हणाले की,न्यायालयाच्या आदेशानुसार वादग्रस्त जागेचे उत्खनन करण्यात आले आणि त्यामध्ये मंदिराचे अवशेष सापडले आहे. त्यामुळे अखेर न्यायालयाने हे मान्य केले आहे की, त्या जागी मंदिर होते आणि हीच प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी आहे. तर ऑक्टोबर २०१८ मध्ये या प्रकरणाचा अंतिम निर्णय येण्याची शक्यता असताना पुन्हा पुढची तारीख देण्यात आली. आजवरचा घटना क्रम पाहता तारीख पे तारीख असे अजून किती वर्षे चालणार आहे.

याच पार्श्वभूमीवर देशभरात धर्म सभेचे आयोजन करण्यात आले असून पुण्यात विराट धर्मसभेचे ९ डिसेंबर २०१८ रोजी धर्म सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत कागशिला पिठाधिश्वर महंत साध्वी प्रज्ञा भारतीय, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष हुकूमचंदजी सावला हे उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. जर सरकारने राम मंदिरासाठी कायदा न केल्यास देशभरात त्याचे पडसाद उमटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राम मंदिराचा मुद्दा सध्या देशभरात गाजतो आहे. राम मंदिरासाठी अध्यादेश काढला जावा ही मागणी शिवसेनेनेही केली आहे. तसेच विरोधकांनी भाजपाकडून फक्त राम मंदिराचं राजकारण केलं जातं आहे असा आरोप विरोधक करत आहेत. अशात आता विहिंपने राम मंदिरासाठी आम्ही जागतिक संस्थांची मदत घ्यायची का असा खोचक सवाल विचारत भाजपावर निशाणा साधला आहे.