देशातील वैज्ञानिक संशोधने लालफितीत अडकणे लज्जास्पद असल्याचे सांगत प्रशासकीय यंत्रणांतून विज्ञानाला मोकळे करण्याची गरज असल्याचे मत, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी मंगळवारी व्यक्त केले. करोना संसर्गाच्या काळात सीएसआयआरने नियोजनबद्ध पद्धतीने संलग्न विविध संस्था आणि उद्योगांच्या सहकार्याने जवळपास दोनशे संशोधने, नवसंकल्पना साकारल्याची माहितीही डॉ. मांडे यांनी दिली.

पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे  आयोजित ‘सायन्स फॉर सोसायटी’ या ऑनलाइन व्याख्यानमालेच्या उद्घाटन सत्रात डॉ. मांडे बोलत होते. पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, प्रशांत गिरबने, डॉ. अरविंद चिंचुरे आदी या वेळी उपस्थित होते.

डॉ. मांडे म्हणाले,‘करोना संसर्गाबद्दल डिसेंबरमध्ये पहिल्यांदा कळले तेव्हा भारतात चाचण्यांची सुविधा मर्यादित होती, उपचार पद्धतीही माहिती नव्हती. करोना संसर्गाची भारतात काय परिस्थिती होऊ शकते याचा विचार करून नियोजनबद्ध आखणी करण्यात आली. त्यात उद्योगांच्या सहकार्याने देशातच उत्पादने विकसित, निर्मिती करण्याचे ठरवले. आतापर्यंत निदान चाचण्या, रुग्णालयांसाठी साधने, लस-औषधे असे वेगवेगळ्या स्तरांवर काम करण्यात आले आहे. टाटा सन्सच्या सहकार्याने किस्परकॅस ही जगातील पहिली कागदावर आधारित  नवीन चाचणी विकसित केली. रिलायन्सच्या सहकार्याने निर्मिती केलेल्या आरटी लॅबला आयसीएमआरच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. तसेच, एक चाचणी पद्धत विकसित करण्यात आली असून, ती आरटीपीआर चाचणीला येणाऱ्या खर्चाच्या निम्म्या खर्चात होऊ शकते. त्यातून दिवसाला कोटय़वधी रुपये वाचू शकतात. मात्र त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही. सिप्लाच्या सहकार्याने औषधाची निर्मिती करून ते बाजारातही उपलब्ध झाले. त्याशिवाय रुग्णालयांसाठी स्वसंरक्षण साधने, कृत्रिम श्वसन यंत्रणा, निर्जंतुकीकरण उपकरणे विकसित करण्यात आली.’

‘मोठय़ा प्रमाणात चाचण्या करण्यासाठी नव्या पद्धती विकसित करण्यात आल्या असून, त्या लवकरच सादर केल्या जातील. औषध कं पन्यांच्या सहकार्याने लसी-औषधांच्या चाचण्या वेगवेगळ्या टप्प्यांत आहेत. त्यांचे आतापर्यंतचे निष्कर्ष अतिशय सकारात्मक आहेत. करोना संसर्गाने आपल्याला काही धडे दिले आहेत. आपण आत्मनिर्भर झाले पाहिजे हा सर्वात मोठा धडा आहे,’ असेही डॉ. मांडे यांनी सांगितले.

वैज्ञानिक ‘अनसंग हिरोज’ इस्रोने उपग्रह अवकाशात पाठवल्यावर देशातील वैज्ञानिकांचे कौतुक होते. पण त्यापलीकडेही देशासाठी वैज्ञानिकांचे योगदान फार मोठे आहे. वैज्ञानिक हे खरे ‘अनसंग हिरोज’ असून, खेळाडू, सैनिकांप्रमाणेच वैज्ञानिकही देशासाठी तितके च महत्त्वाचे आहेत, असेही डॉ. मांडे यांनी आवर्जून नमूद केले.