‘सध्याच्या काही तरूण कलाकारांकडे पाहता हे वातावरण मनाला त्रास देते. साधक कलाकारच कलेला न्याय देतो. संगीताचा धंदा होऊ शकत नाही,’ असे मत ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ यांनी व्यक्त केले.
शनिवारवाडा कला महोत्सवाचे रविवारी उस्मान खाँ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. ‘राजहंस प्रकाशन’चे दिलीप माजगावकर, ‘चित्रलीला निकेतन कला महाविद्यालय’चे संस्थापक अध्यक्ष उमेश गुप्ते आणि प्राचार्य सुनीती जाधव आंबिलढोक यांना त्या संस्थांच्या साहित्य व कला क्षेत्रातील योगदानाबद्दल उस्मान खाँ यांच्या हस्ते गौरवण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक रा. ग. जाधव, शनिवारवाडा कला महोत्सव समितीचे विजय काळे या वेळी उपस्थित होते.
उस्मान खाँ म्हणाले, ‘‘मी दहा वर्षांचा असताना वडिलांबरोबर पुण्यात आलो होतो. इतका लहान मुलगा तयारीने सतार वाजवू शकतो या गोष्टीचे पुणेकरांनी केलेले कौतुक मनावर कोरले गेले. त्यानंतर वयाच्या सतराव्या वर्षी पुण्यात परतलो आणि पुण्याचाच झालो. हा रसिकांचा गाव आहे! भारतीय शास्त्रीय संगीतच सगळ्या संगीताचा पाया आहे. आजच्या काळात सांस्कृतिक अतिक्रमण होत आहे. काही तरूण कलाकारांकडे पाहता सध्याचे वातावरण मनाला त्रास देते.’’
मराठी वाचक आणि मराठी भाषेची चिंता करण्याजोगी परिस्थिती नसल्याचे माजगावकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘गेल्या पन्नास वर्षांत मराठी पुस्तकांना मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे. प्रकाशकच काही वेळा नवे विषय आणि नव्या शैली शोधण्यात कमी पडतात. मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी मात्र वेगळे प्रयत्न करण्याची गरज आहे.’’
उद्घाटन समारंभानंतर गायक चैतन्य कुलकर्णी, मेघना सहस्रबुद्धे, प्रियांका बर्वे यांनी ‘स्वप्न स्वरांचे’ हा चित्रपटगीते आणि भावगीतांचा कार्यक्रम सादर केला. प्रसन्न बाम, अमृता केदार, अमित कुंटे आणि अभय इंगळे यांनी कार्यक्रमाला साथसंगत केली.