शरद पवार हे सधन तालुक्यातील आहेत; पण ते दुष्काळग्रस्तांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी दुष्काळग्रस्तांचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न केला तर विखे पाटील यांच्या पोटात का दुखते, असा प्रश्न विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांनी मंगळवारी उपस्थित केला. पालकमंत्री गिरीश बापट यांचे नाव न घेता कसे बोलावे याचे भान पुणेकरांनी सोडले आहे, अशीही टीका मुंडे यांनी केली.
महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शनिवारवाडा सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन मुंडे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. दुष्काळग्रस्तांसाठी आंदोलन सुरू केल्यानंतर विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका सुरू केली. मात्र दुष्काळग्रस्तांसाठी पवार यांनी काम सुरू केल्यानंतर विखे पाटील यांच्या पोटात का दुखते, अशी विचारणा मुंडे यांनी यावेळी केली.
महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागूल, सभागृहनेता शंकर केमसे, विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन कार्यक्रमानंतर कलाकारांनी ढोल-लेझीमसह गणेश वंदना सादर केली. त्यानंतर शर्वरी जमेनिस, संस्कृती बालगुडे, तेजा देवकर, मेघा घाडगे यांनी नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली.