ज्येष्ठ कॉपीरायटर शरद देशपांडे यांच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून त्यांच्या हस्ताक्षरातील सौंदर्य टिपणारा ‘शरद ७५’ हा खास देवनागरी फाँट विकसित करण्यात आला आहे. प्रदीर्घ कारकीर्द असलेल्या कॉपीरायटरला या फाँटच्या माध्यमातून मानाचा मुजरा करण्यात आला आहे.
शरद देशपांडे यांच्या दूरदृष्टी असलेल्या मराठी कॉपीरायटरमुळे भावस्पर्शी सुलेखन हा सेतू अॅडव्हर्टायझिंगचा महत्त्वाचा घटक राहिला आहे. कलात्मक स्वरूपातील या त्यांच्या लेखनामुळे मराठी कॉपीरायटिंग कलेला एक सृजनशीलतेची ओळख प्राप्त झाली आहे. देशपांडे यांनी अमृतमहोत्सवी वर्षांत पदार्पण केले आहे. त्यांच्या या कारकिर्दीला मानाचा मुजरा करण्याच्या उद्देशातून ‘शरद ७५’ हा मराठी फाँट विकसित केला आहे.
सेतू अॅडव्हर्टायझिंगचे ऋग्वेद देशपांडे आणि ऋतुपर्ण देशपांडे यांनी हा फाँट विकसित केला आहे. ते म्हणाले, वडिलांच्या कॉपीरायटिंग क्षेत्रातील प्रवासाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त यापूर्वीच ‘शब्दार्थ’ हे कॉपीरायटिंग विषयावरील पहिले पुस्तक प्रकाशित केले होते. यावर्षी त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त त्यांच्याच हस्ताक्षरातील सौंदर्यात्मकता टिपणारा खास फाँट विकसित केला आहे. एखादी गोष्ट स्वत:च्या हाताने लिहिली तर त्यात मायेची आणि आपुलकीची ऊब जाणवते. पण, आजच्या टंकलिखित मजकुरात ही गोष्ट हरवलेली दिसते. ही बाब ध्यानात घेऊन ‘शरद ७५’ या फाँटच्या माध्यमातून आपुलकीच्या उबदारपणाची भावना रुजविण्याचा आमचा प्रयत्न आहे. ओटीएफ फॉरमॅटमध्ये असलेला हा हस्तलिखित फाँट  setuadvertising.com/sharad75 येथून विनामूल्य डाऊनलोड करता येणार आहे.