मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे शरद पवारांचे शिष्टमंडळास आश्वासन

महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी ताईंना परस्पर आणि अपुरी वाढ जाहीर केली. हा निर्णय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला मान्य नसल्याने बेमुदत बंद सुरूच राहणार असल्याचे समितीचे राज्य उपाध्यक्ष नितीन पवार यांनी स्पष्ट केले. अंगणवाडी सेविकांना १५०० रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांना १२५० रुपये, तर मदतनिसांना १००० रुपये मासिक इतकी तुटपुंजी वाढ जाहीर केली. ती अपुरी आणि सदोष असून, ज्येष्ठता, शिक्षण आदी मुद्दय़ांना बगल देणारी आहे. त्यामुळे आम्हाला हा निर्णय मान्य नाही. शासनाने कृती समितीशी चर्चा करून सन्मानजनक तोडगा काढावा, असेही नितीन पवार यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्रात अंगणवाडी ताईंना इतर राज्यांच्या तुलनेत कमी मानधन मिळते याची मला कल्पना आहे. अंगणवाडी हा मानवविकासाचा कणा असून अंगणवाडी बंदप्रश्नी मार्ग काढण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या शिष्टमंडळाला दिले.

पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. अंगणवाडी कर्मचारी सभेचे राज्य उपाध्यक्ष नितीन पवार यांनी त्यांना निवेदन दिले. राज्यव्यापी बंदमुळे दोन लाख दहा हजार अंगणवाडी ताई संपावर आहेत. राज्यातील ५० लाख बालके पूरक आहार आणि ३५ लाख बालके पूर्व प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहात आहेत. याचे राज्यशासनाला गांभीर्य नसून मुख्यमंत्री याबाबत बोलायला तयार नाहीत. उलट संप चिरडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून आपण याबाबत मार्ग काढावा, अशी विनंती शरद पवार यांना नितीन पवार यांनी केली. त्यावर शरद पवार यांनी वरील आश्वासन दिले.

शिष्टमंडळाने याच कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांचीही भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्या वेळी बापट म्हणाले, की अंगणवाडी ताईना मानधन कमी आहे हे आम्हाला तत्त्वत: मान्य आहे. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेता एकदम एकाच वेळी मानधनात फार मोठी वाढ देणे शक्य होईल असे वाटत नाही. टप्प्याटप्प्याने दरवर्षी थोडी- थोडी अशी वाढ देण्याबद्दल विचार होऊ शकतो. या संदर्भात आपण पंकजा मुंडे, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलू.