देशात ऊस आणि कापूस उत्पादनामध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. बीटी कॉटन वाणाच्या कापसावर मोठय़ा प्रमाणावर रोग पसरला आहे. त्यावर राज्य शासनाने तातडीने उपाय शोधायला हवेत. नाही तर यंदा आíथक नुकसान सोसलेला शेतकरी पुढील वर्षी संपूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची भीती आहे, असे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोमवारी सांगितले.

सृष्टी ऑरगॅनिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो प्रॉडक्ट्सतर्फे उभारण्यात आलेल्या सेंद्रिय शेतीतील उत्पादनांच्या विक्री केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. संस्थेचे संस्थापक श्रीराम पिंगळे, सेंद्रिय शेती सल्लागार यतीन पटवर्धन, लखनऊ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, डॉ. शंकर राऊत या वेळी उपस्थित होते. सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकरी नंदा भुजबळ यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

पवार म्हणाले, कर्जामुळे आधीच विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच यंदा कापसाच्या बीटी कॉटन वाणावरील गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे हजारो हेक्टरवरील कापसाचे नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी आíथक संकटाच्या खाईत लोटला गेला असून बीटी कॉटन वाणावरील रोगाबाबत तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

गुजरातने अमूलच्या रूपाने शेतमालही ब्रॅण्ड करून दाखविला आहे. महाराष्ट्रातही चांगल्या प्रकारे सेंद्रिय शेती उत्पादने होतात. या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एकच ब्रॅण्ड तयार करावा, त्यामुळे त्याला अधिक बाजारपेठ आणि किंमत मिळू शकेल. पुण्यात सेंद्रिय शेतीतील उत्पादनांना चांगली मागणी असल्याने थेट माल विकता यावा, यासाठी मगरपट्टा, हिंजवडी, नांदेड सिटी, अ‍ॅमानोरा पार्क येथे शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती उत्पादनांची बाजारपेठ उभी करू. निमसे म्हणाले, पारंपरिक शेती ही दिवसेंदिवस परवडेनाशी झाली आहे. त्यामुळे यापुढे सेंद्रिय शेती हा पर्याय होऊ शकेल. यासाठी सरकारने बाजारपेठ निर्माण करून देण्याची गरज आहे.

..तर मला फडणवीसांशी बोलावे लागेल

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या काही शेतकऱ्यांनी कापसाला भाव मिळत नसल्याची तक्रार शरद पवार यांच्याकडे केली. त्यावेळी उत्पादनक्षमता कशी वाढेल याची माहिती घेण्यासाठी येथे आलो आहे. दराबाबत मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलावे लागेल, असे पवार यांनी सांगितले.