वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती सध्या अत्यंत गंभीर आहे. ३ वर्षांपूर्वी म्हणजे भाजप विरोधकाच्या भूमिकेत असताना ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ असा प्रश्न भाजपकडून सत्ताधाऱ्यांना विचारला जात होता. मात्र आता याच भाजप सरकारला जनताच विचारू लागली आहे की,  ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ असे म्हणत शरद पवारांनी भाजप सरकारला टोला लगावला आहे. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमानंतर शरद पवारांनी ही प्रतिक्रिया देत वाढत्या महागाईवरून सरकारवर टीका केली.

सध्याच्या घडीला देशातील जनता ही विरोधकांकडे पर्याय म्हणून पाहते आहे. आता समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. लवकरच आम्ही समविचारी पक्षांसोबत चर्चा करून, पुढील पावले उचलणार आहोत असेही शरद पवारांनी म्हटले आहे.

नारायण राणे यांना काही दिवसांपूर्वीच आपण सबुरीचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षही सोडला. आता त्यांना काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यावा. मात्र मागील तीन निवडणुकांमध्ये नारायण राणे यांना जनतेने नापसंती दर्शवली असे कोकणातले एक नेते म्हणाल्याचे मी वाचले आहे. यामुळे सिंधुदुर्ग भागातील लोकांना राणेंचा निर्णय कितपत रुचेल हा प्रश्न आहे असेही शरद पवारांनी म्हटले आहे.