राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठराव
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष निवडीबाबत सोमवारी बोलावण्यात आलेल्या बैठकीत कोणताही निर्णय न घेता अध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार पक्षाध्यक्ष शरद पवार यांना देण्याचे निश्चित करण्यात आले. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता लोकांमध्ये जाऊन काम करणारा शहराध्यक्ष असावा अशी अपेक्षा पक्षाच्या बठकीत व्यक्त करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी महापौर बंगल्यावर बोलावण्यात आली होती. पक्षाचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत ही बठक झाली. खासदारपदी निवड झाल्यानंतर लगेचच चार महिन्यात शहराध्यक्षपदाचा मी राजीनामा दिला होता असे स्पष्ट करून विद्यमान अध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण यांनी त्यांच्या कारकिर्दीचा आढावा बैठकीत सादर केला. संसेदत अनेक विषयावर चांगली भाषणे केली. पक्षासाठी जास्तीत जास्त वेळ दिला. तरीही टीका होत असल्याची व्यथा व्यक्त करताना त्या हळव्या झाल्या. राष्ट्रवादीच्या नगरसेविका नंदा लोणकर आणि माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांनी वंदना चव्हाण या चांगल्या काम करत असून त्याच पुन्हा अध्यक्ष असाव्यात अशी भूमिका बैठकीत मांडली.
आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता शहराध्यक्ष बदलला पाहिजे. अध्यक्ष लोकांमध्ये काम करणारा असावा असे दत्ता एकबोटे म्हणाले. पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, आमदार जयदेव गायकवाड, बापू पठारे यांनीही मनोगत व्यक्त केले. शहराध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुनील तटकरे यांना देण्याचा ठराव आमदार अनिल भोसले यांनी बैठकीत मांडला. या ठरावाला काकडे यांनी अनुमोदन दिले. येत्या काही दिवसात नवीन शहाराध्यक्षाची घोषणा केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.
पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली आहेत. येत्या काही दिवसात शहराध्यक्ष जाहीर केला जाईल, असे तटकरे यांनी सांगितले, तर आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करा, असे अजित पवार यांनी सांगितले.